अतिजोखमीच्या आजारांमुळे राज्यात झाले सर्वाधिक मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 03:09 AM2021-01-11T03:09:09+5:302021-01-11T03:09:52+5:30
राज्यात आतापर्यंत ५०,०२७ मृत्यूंची नोंद झाली आहे, यापैकी सर्वाधिक मृत्यू हे ६०-७० वयोगटातील आहेत. प्रत्येक पाचव्या मृत्यूमागे उच्च रक्तदाब आणि मधुमेह ही कारणे आहेत.
मुंबई : राज्यात कोरोना बळींचा आकडा ५० हजारांच्या वर गेला आहे. त्यात सर्वाधिक मृत्यू अतिजोखमीच्या आजारांमुळे झाले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक बळी उच्च रक्तदाबामुळे झाल्याचे समोर आले आहे.
राज्यातील दहापैकी सात रुग्णांचे मृत्यू कोरोनासह अन्य आजार असल्याने झाले आहेत. कोरोनामुळे ओढावलेल्या मृत्यूंमध्ये ४६.७ टक्के रुग्णांना उच्च रक्तदाब, तर ३९.४ टक्के रुग्णांना मधुमेहाची लागण झाली आहे. त्यामुळे आता लसीकरणाच्या प्रक्रियेतही अतिजोखमीच्या आजार असणाऱ्या गटांना प्राधान्य दिले जाणार आहे.
राज्यात आतापर्यंत ५०,०२७ मृत्यूंची नोंद झाली आहे, यापैकी सर्वाधिक मृत्यू हे ६०-७० वयोगटातील आहेत. प्रत्येक पाचव्या मृत्यूमागे उच्च रक्तदाब आणि मधुमेह ही कारणे आहेत. तर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक प्रमाण पुरुषांचे आहे, पुरुष रुग्णांच्या मृत्यूचे ६९.८ टक्के प्रमाण असून ही संख्या ३४ हजार ९९९ मृत्यू झाले आहेत. दर ३०.२ टक्के महिलांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. मागील दोन महिन्यात कोरोना मृत्युदरांत मोठ्या प्रमाणात घट झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.