Join us

सणासुदीत आॅनलाइन आॅफर्सची सर्वाधिक धूम

By admin | Published: November 03, 2015 1:26 AM

ई-कॉमर्सच्या विश्वात आॅनलाइन शॉपिंगची धूम जोरात असल्याने ऐन सणासुदीच्या काळात मॉल्स व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे. ‘द असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स आॅफ इंडिया’ने केलेल्या

मुंबई : ई-कॉमर्सच्या विश्वात आॅनलाइन शॉपिंगची धूम जोरात असल्याने ऐन सणासुदीच्या काळात मॉल्स व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे. ‘द असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स आॅफ इंडिया’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार सणासुदीच्या काळात मॉल्सच्या व्यवसायाला तोटा होणार असून त्यांचे तब्बल ५१ टक्के नुकसान होणार असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वेक्षणानुसार, गेल्या दोन वर्षांत सुरू झालेल्यांपैकी ६०-७० टक्के मॉल्स बंद झाल्याचे आढळले आहे. यापैकी काही मॉल्स ग्राहकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरले, तर काहींकडे ग्राहक फिरकलेच नसल्याने मॉल्स बंद झाले आहेत. या सर्वेक्षणादरम्यान ७०० मॅनेजर्स, मॉल्स प्रतिनिधी आणि मार्केटर्सकडून माहिती घेऊन ही निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. त्यात देशभरातील दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, चंदिगढ आणि डेहराडून या मेट्रो शहरांचा समावेश आहे.आर्थिक मंदी, आॅनलाइन शॉपिंगचे वाढते फॅड, व्याजदरांचा वाढता आलेख, महागाईचा भस्मासूर या प्रमुख कारणांमुळे ग्राहक मॉल्सकडे पाठ फिरवत आहेत. नऊ प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, एकूण ५९ टक्के मॉल्स या कारणांमुळे रिक्त आहेत. तसेच दिल्लीतील ६८.५ टक्के, मुंबईतील ६५ टक्के, अहमदाबाद येथील ६१ टक्के, चेन्नईतील ६० टक्के मॉल्स सर्वेक्षणानुसार रिक्त असल्याचे आढळले आहे. (प्रतिनिधी)या सर्वेक्षणानुसार यंदा सणासुदीच्या काळात ५५ कोटींच्या घरात उलाढाल होण्याची शक्यता वर्तविली आहे, तर सर्वाधिक उलाढाल मोबाइल फोन्स, इलेक्ट्रॉनिक्स, डिझायनर फर्निचर, ज्वेलरी आणि होम डेकोरेशन्स या क्षेत्रात होईल. यंदा ग्राहकांची सर्वाधिक पसंती भारतीय आणि पाश्चिमात्य ब्रॅण्ड्सने संयुक्तपणे सुरू केलेल्या संकेतस्थळांना असल्याचेही या सर्वेक्षणात म्हटले आहे.