राज्यात महिलांच्या सर्वाधिक आत्महत्या, ‘एनसीआरबी’चा अहवाल, ७६८ जणींनी संपविले आयुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 01:38 AM2017-12-12T01:38:16+5:302017-12-12T01:38:29+5:30
बदलती जीवनशैली, वाढता कामाचा तणाव, कौटुंबिक हिंसाचार, हुंड्यासाठी छळ, मानसिक दबाव, प्रेमसंबंध, असुरक्षितेची भावना यातून राज्यातील तब्बल ७६८ जणींनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : बदलती जीवनशैली, वाढता कामाचा तणाव, कौटुंबिक हिंसाचार, हुंड्यासाठी छळ, मानसिक दबाव, प्रेमसंबंध, असुरक्षितेची भावना यातून राज्यातील तब्बल ७६८ जणींनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. देशात जानेवारी ते डिसेंबर २०१६ या वर्षात घडलेल्या अशा ४ हजार ४८५ घटनांमध्ये राज्यातील महिला आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. याला गोवा अपवाद असून, तेथे फक्त एकाच महिलेने आत्महत्या केल्याचे नोंद आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालातून (एनसीआरबी) ही माहितीसमोर आली आहे.
एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात देशात ४ हजार ४८५ महिलांना आत्महत्येस प्रवृत केल्यामुळे, त्यांनी स्वत:चे आयुष्य संपविले. दुर्दैवी बाब म्हणजे, यात महाराष्टÑातील सर्वाधिक ७६८ महिलांनी आत्महत्या केली आहे. या पाठोपाठ मध्य प्रदेश (५६५), तेलंगणा (५६०)चा क्रमांक लागतो.
राज्यात महिलांवरील अत्याचाराचे ३१ हजार ३३८ गुन्हे दाखल आहेत. राज्यातून ६ हजार १७० महिलांचे अपहरण झाले असून, ४ हजार १८९ जणी लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. अशात वाढत्या कौटुंबिक हिंचारामुळे, ताणतणावामुळे यापैकी ७६८ जणींनी स्वत:चे आयुष्य संपविले. यामध्ये मुंबईतील १२ जणींचा समावेश आहे.
दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा आलेख अन्य राज्याच्या तुलनेत गोव्यामध्ये कमी आहे. येथे वर्षभरात एकाच महिलेने आत्महत्या केल्याची नोंद असून, महिलांवरील अत्याचाराचे वर्षभरात ३७१ गुन्हे दाखल आहेत. हा आकडा अन्य दोन वर्षांच्या तुलनेत कमी होताना दिसत असल्याची माहिती एनसीआरबीच्या अहवालातून उघड होत आहे.
तक्रारीसाठी पुढे या...
कौटुंबिक अत्याचारामुळे त्रस्त असणाºया महिलांनी स्वेच्छेने पुढे येऊन पोलिसांत याबाबत तक्रारी केल्यास, त्या प्रश्नावर उपाय व पर्यायासाठी इतर चांगले मार्ग महिलांसाठी खुले होतील, असे मत अनेक महिला पोलीस अधिकाºयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कुटुंबीय, नातेवाइकांनी त्यांना समजून घेणे गरजेचे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले.