दिवसभरात ३० हजार रुग्ण : मुंबईतही उच्चांक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाच्या राक्षसाने रौद्ररूप धारण केले आहे. सलग पाचव्या दिवशी राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. रविवारी राज्यात तब्बल ३० हजार ५३५ रुग्णांची नोंद झाली. याआधीची सर्वाधिक दैनंदिन रुग्ग्णंसख्या २० मार्चला २७ हजार १२६ इतकी नोंदवली गेली होती.
राज्यात रविवारी दिवसभरात ९९ जणांचा मृत्यू झाला. मुंबईतही कोरोनाचा उद्रेक झाला असून, दिवसभरात तीन हजार ७७५ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २४ लाख ७९ हजार ६८२ इतका झाला असून, मृतांचा आकडा ५३ हजार ३९९ झाला आहे. राज्यात सध्या दोन लाख दहा हजार १२० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात नऊ लाख ६९ हजार ८६७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, नऊ हजार ६०१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
राज्यात ११ हजार ३१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत २२ लाख १४ हजार ८६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.३२ टक्के झाले असून, मृत्युदर २.१५ टक्के आहे. राज्यात अन्य कारणांमुळे एक हजार २९६ रुग्णांचा बळी गेला असून, मुंबईत ही संख्या ९१६ इतकी आहे.
आजपर्यंत तपासलेल्या एक कोटी ८३ लाख ५६ हजार २०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.५१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
उपचाराधीन रुग्णांचा आलेख वाढता
जिल्हा उपचाराधीन रुग्ण एकूण रुग्ण
पुणे ४२ हजार १५ ४ लाख २० हजार ८६७
नागपूर २९ हजार ७७१ १ लाख ६३ हजार ७०
मुंबई २२ हजार ८१ ३ लाख २८ हजार ९२
ठाणे १९ हजार ७८८ ३ लाख ६ हजार १०
नाशिक १५ हजार ६१९ १ लाख ५० हजार ६३७
मुंबईत कोरोनाचा उद्रेक; दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतही ३७७५ इतकी आतापर्यंतची सर्वाधिक कोरोनाची दैनंदिन रुग्ग्णंसख्या रविवारी नोंदवली गेली. याआधी १९ मार्चला ३०६२ इतकी उच्चांकी रुग्णनोंद झाली होती. रविवारी दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत सध्या २३ हजार ४४८ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
शहर उपनगरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन लाख ६२ हजार ६५४वर पोहोचला आहे. दिवसभरात दहा जणांचा मृत्यू झाल्याने, मृतांचा आकडा ११ हजार ५८३वर पोहचला आहे, तर एक हजार ६४७ जणांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा तीन लाख २६ हजार ७०८वर पोहोचला आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी १०६ दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ४० चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत, तर ३१६ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत ३७ लाख ११ हजार १०३ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
अशी वाढली रुग्णसंख्या
मुंबईत ६ जानेवारीला ७९५, त्यानंतर रोज ३०० ते ५०० दरम्यान रुग्ण आढळून येत होते. १४ फेब्रुवारीला ६४५ रुग्ण आढळून आले होते. त्यात वाढ होऊन १ मार्चला ८५५, २ मार्चला ८४९, ३ मार्चला ११२१, ४ मार्चला ११०३, ५ मार्चला ११७३, ६ मार्च ११८८, ७ मार्चला १३६०, ८ मार्चला १००८, ९ मार्चला १०१२, १० मार्चला १५३९, ११ मार्चला १५०८, १२ मार्चला १६४६, १३ मार्चला १७०८, १४ मार्चला १९६२, १५ मार्चला १७१२, १६ मार्च १९२२, १७ मार्चला २३७७, १८ मार्चला २८७७, १९ मार्च ३०६२, २० मार्चला २९८२, २१ मार्चला ३७७५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.