पूरग्रस्त जिल्ह्यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य - गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:05 AM2021-07-28T04:05:59+5:302021-07-28T04:05:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील १६ जिल्ह्यांतील १ हजार १२९ पाणीपुरवठा ...

The highest priority is to streamline the water supply in the flood-hit district - Gulabrao Patil | पूरग्रस्त जिल्ह्यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य - गुलाबराव पाटील

पूरग्रस्त जिल्ह्यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य - गुलाबराव पाटील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील १६ जिल्ह्यांतील १ हजार १२९ पाणीपुरवठा योजना बाधित झाल्या आहेत. बाधित जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून त्यादृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करण्यासाठी डिझेल जनरेटरची व्यवस्था, क्लोरीनेशन करणे, टँकरने पाणीपुरवठा करणे, बोअरवेलची किरकोळ दुरुस्ती, पंपाची दुरुस्ती, पाणीपुरवठा लाइन दुरुस्तीसाठी ११ कोटी २२ लाखांचा निधी तत्काळ लागणार आहे. तर जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनांच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी ३१ कोटी ६५ लाख असे एकूण ४२ कोटी ८८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या तातडीची बाब म्हणून जिल्हा परिषदांसह स्थानिक प्रशासनाच्या उपलब्ध निधीतून कामे सुरू करण्यात आलेली आहेत. यासंदर्भात महसूल तसेच मदत व पुनर्वसन विभागाकडे निधीची मागणी करण्यात आल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

जिथे किरकोळ दुरुस्तीने पाणीपुरवठा करणे शक्य आहे तेथे तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. तर, जिथे वीजपुरवठा खंडित आहे तिथे बोअरवेल, विहिरींतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आपत्तीग्रस्त भागात पुरेसा व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. अतिसार व इतर साथीचे आजार होऊ नये म्हणून क्लोरीनद्वारे पाणी शुद्धीकरण करणे तसेच परिसर स्वच्छतेच्या संदर्भातही आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे जे हॅण्ड पंप, विद्युत पंप, सोलर पंप नादुरुस्त झाले आहेत, ज्या विहिरींमध्ये गाळ साचला आहे अशा ठिकाणी स्वच्छता करून ते तत्काळ दुरुस्त करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेची पथके प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहेत. कोल्हापूर येथे चार, सांगलीत दोन, तर रत्नागिरीत दोन अतिरिक्त पथके पाठविण्यात आल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

Web Title: The highest priority is to streamline the water supply in the flood-hit district - Gulabrao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.