Join us

महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

By admin | Published: March 18, 2015 1:21 AM

महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. केवळ नागरिकांची सुरक्षाच नव्हे तर त्यांच्यासाठी निर्भय वातावरण निर्मितीला प्राधान्य दिले जाईल,

ठाणे : महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. केवळ नागरिकांची सुरक्षाच नव्हे तर त्यांच्यासाठी निर्भय वातावरण निर्मितीला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही परमवीर सिंग यांनी दिली. ठाण्याचे २२ वे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.विजय कांबळे यांची राज्य सुरक्षा रक्षक दलाच्या प्रमुख पदी पदोन्नतीवर बदली झाल्यानंतर गेला आठवडाभर ठाण्याचे आयुक्तपद रिक्तच होते. या कालावधीत सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी तात्पुरता पदभार सांभाळला होता. राज्य राखीव दलाच्या (एसआरपीएफ) प्रमुख पदावरून ठाण्याच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर लक्ष्मीनारायण यांच्याकडून त्यांनी दुपारी १२च्या सुमारास पदाची सूत्रे स्वीकारली. एकीकडे मीरा बोरवणकर, एस. पी. यादव, ए. के. पाठक आणि के. एल. प्रसाद या ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे, ठाण्याच्या आयुक्तपदासाठी चर्चेत असताना सिंग यांचे नाव जाहीर करून फडणवीस सरकारने राजकीय नेत्यांप्रमाणे वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे अंदाजही फोल ठरविले. सरकारने सोपविलेली जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडण्याचे प्रयत्न करूच, पण महिलांवरील अत्याचाराचा बिमोड करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. छेडछाड, लैंगिक अत्याचार, हुंडयासाठी छळ तसेच मंगळसूत्र चोरीच्या गुन्हयांवर नियंत्रण आणण्यावर भर देणार आहे. याशिवाय, कायदा व सुव्यवस्था, जातीय सलोखा राखण्यासाठी सहकारी अधिकाऱ्यांशी तसेच वरीष्ठ निरीक्षकांशी चर्चा करुन खास योजना आखण्याचा मानस आहे. त्यामुळे शहरात सुरक्षेप्रमाणेच निर्भय वातावरण निर्माण करण्यावर आपण लक्ष केंद्रीत करू, असे परमवीर सिंग यांनी ‘लोकमत’ला सांगितले. १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या सिंग यांनी यापूर्वी कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणूनही चांगला ठसा उमटविला आहे.