मुंबई : ब्रिमस्टोवॅड (बृहन्मुंबई स्टॉर्म वॉटर डिस्पोजल सिस्टीम) प्रकल्पांतर्गत खारदांडा येथे उभारण्यात येणाऱ्या पम्पिंग स्टेशनचा महापालिकेच्या मार्गातील अडथळा मंगळवारी उच्च न्यायालयाने दूर केला. खारदांडा येथे असलेली १५६ तिवरे तोडण्यास उच्च न्यायालायाने परवानगी दिली. मात्र त्याऐवजी वन व पर्यावरण विभागाच्या आदेशानुसार अन्य ठिकाणी तेवढ्याच तिवरांचे पुनर्रोपरण करण्याचे आदेश महापालिकेला दिले. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे मुंबईतील सखल भागांना दिलासा मिळणार आहे.ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत खारदांडा येथील गजदारबंद येथे २,७०० चौ. मी. परिसरात पम्पिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र या ठिकाणी तिवर असल्याने महापालिकेचे पम्पिंग स्टेशन रखडले. त्यामुळे ही तिवरे तोडून अन्य ठिकाणी लावण्याची परवानगी देण्याकरिता महापालिकेने उच्च न्यायालयात अर्ज केला. या अर्जावरील सुनावणी न्या. व्ही.एम. कानडे व न्या. रेवती मोहिते- ढेरे यांच्या खंडपीठापुढे होती.त्यावर खंडपीठाने महापालिकेला १५६ तिवरे तोडण्याची परवानगी दिली. मात्र वन व पर्यावरण विभागाकडून आवश्यक ती परवानगी घेण्यासही सांगितले. तसेच वन व पर्यावरण विभागालाही महापालिकेच्या अर्जावर आठ आठवड्यांत निर्णय घेण्यास सांगितले. या प्रकल्पामुळे सांताक्रुझ (पश्चिम), खार (पश्चिम) आणि मिलन सब-वे या सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साठणार नाही, असे महापालिकेचा दावा आहे. (प्रतिनिधी)
ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
By admin | Published: January 13, 2016 1:30 AM