Join us

पवईतील उच्च शिक्षित तरुणाची ११ लाखांना फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 4:35 AM

मुंबई : लॉकडाऊनमुळे विमानतळावरील नोकरी सुटली. पुढे नोकरीच्या शोधात असताना, सोशल मीडियावर अँना पट्रिक नावाच्या महिलेशी ओळख झाली. ओळखीचे ...

मुंबई : लॉकडाऊनमुळे विमानतळावरील नोकरी सुटली. पुढे नोकरीच्या शोधात असताना, सोशल मीडियावर अँना पट्रिक नावाच्या महिलेशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत होताच, दोघांनी सोबत व्यवसाय करण्याचे सांगितले. याच व्यवसायासाठी पाठविलेले पैसे आणि गिफ्टसाठी तरुणाला ११ लाख ३ हजार गमाविण्याची वेळ आली आहे.

पवई परिसरात २९ वर्षीय राज (नावात बदल) कुटुंबीयासोबत राहतो. तो विमानतळ येथील हॉटेलमध्ये नोकरी करत होता; मात्र लॉकडाऊनमुळे नोकरी सुटली. त्यातच २८ डिसेंबर रोजी त्याला अँना पट्रीक नावाच्या महिलेची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याने ती स्वीकारताच दोघांमध्ये संवाद सुरू झाला. व्हॉट्सॲप क्रमांक शेअर करत त्यावरून संवाद वाढला. अशात अँनाने भारतात व्यवसाय करायचा असल्याचे सांगून मदत करण्यास सांगितले. पुढे २ जानेवारी रोजी तिने व्यवसायासाठी पैसे आणि गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. त्यापाठोपाठ दिल्ली विमानतळावरील कस्टम अधिकारी बोलत असल्याचे सांगून, ५० हजार पाउंड्स आणि एक गिफ्ट असल्याचे सांगितले. पुढे यासाठी वेगवेगळे शुल्क आणि दंड भरण्याच्या नावाखाली ११ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. पुढे आणखीन पैशांची मागणी होताच तरुणाला संशय आला. त्याने पैसे परत करण्यासाठी तगादा लावला; मात्र यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्याने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.