महामार्ग खड्ड्यात
By admin | Published: July 31, 2014 01:13 AM2014-07-31T01:13:08+5:302014-07-31T01:13:08+5:30
सायन-पनवेल महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातामध्येही वाढ होत आहे
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
सायन-पनवेल महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातामध्येही वाढ होत आहे. खड्डे दुरुस्तीचे काम वेगाने होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे.
सायन पनवेल मार्गावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाचे रुंदीकरण केले आहे. तर मार्गावर आवश्यक ठिकाणी पूलदेखील उभारलेले आहेत. याकरिता सुमारे बाराशे कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. संपूर्ण मार्गावरील काँक्रिटीकरणाचा भाग वगळता डांबरीकरण केलेल्या भागात हे खड्डे पडले आहेत. नवी मुंबई हद्दीत या मार्गाच्या वाशी गाव व तळोजा या दोनही टोकाला खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. नवी मुंबईत येण्यासाठी वाशी टोलनाका ओलांडताच या खड्ड्यांचे साम्राज्य सुरू होत असून ते थेट तळोजापर्यंत आहे. त्यामुळे सायन-पनवेल मार्गावरील हे खड्डे जणू नवी मुंबईत प्रवेश करणाऱ्यांच्या स्वागतासाठीच सज्ज असल्याचे दिसत आहे. मार्गावर नव्याने उभारलेला शिरवणे येथील संपूर्ण पूलच खड्डेमय झालेला आहे. त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांच्या गतीला ब्रेक लागत असून तेथे वारंवार वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे वाहतूककोंडी सोडवण्यासाठी बांधलेला हा पूलच वाहतूककोंडीला कारणीभूत ठरत आहे. पहिल्याच पावसाने या पुलाच्या कामाच्या दर्जाचा भांडाफोड केला आहे. त्यामुळे पर्यायी या पुलावर गेल्या काही दिवसांत दोनदा सुधारकाम करण्यात आले. त्यानंतरही हे खड्डे जसेच्या तसे दिसत आहेत. तर खड्डे बुजवण्यासाठी वापरलेली खडी पुलावर सर्वत्र पसरून तेथे अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोपरा येथील पुलाच्या बांधकामात तांत्रिक त्रुटी असल्याचे दिसून येत आहे. या पुलाच्या स्पॅगेटीकडील दिशेस मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. पुलाच्या उताराला साचणारे हे पाणी निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजनाच तेथे करण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणचे डांबर काढून रस्त्याच्या मध्येच ड्रम मांडण्यात आले आहेत. शिवाय रस्त्याच्या नव्या व जुन्या कामाने एकाच रस्त्याचे दोन भाग निर्माण झाले आहेत. तेथे अपघाताची शक्यता असतानाही कोणत्याही प्रकारचे सूचनांचे फलक लावलेले नाहीत. त्यामुळे मार्गावर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)