पनवेल : पनवेल-सायन महामार्गावर नव्याने टोलनाके उभारण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मात्र महामार्गावर पडलेल्या खड्डय़ांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दररोज महामार्गावर लहान-मोठे अपघात घडत असून वाहतूक कोंडी होते. मुंबई ते पुणो हे अंतर कमी करण्यासाठी पनवेल-सायन महामार्गाचे रूंदीकरण करण्यात आले असून काही ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. मुंबईकडे जाणा:या वाहनांसाठी कोपरा आणि पनवेलकडील बाजूला कामोठा वसाहतीच्या हद्दीत टोलनाका उभारण्याचे काम सुरू आहे.
महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, दोन ब्रीजचे काम अपूर्ण आहे. 24 किमी अंतरावर अनेक ठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. विशेषत: उड्डाणपुलावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले असून पावसाचे पाणी साठत असल्याने वाहनचालकांना खड्डय़ांचा अंदाज येत नाही आणि गाडय़ा उसळत असल्याचे चालकांचे म्हणणो आहे. महामार्गाच्या कडेला डांबरी रस्ते करण्यात आले असून त्या लेनची अक्षरश: चाळण झाली आहे.
विशेषत: मार्बल मार्केट ते कळंबोली सर्कलर्पयत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून वाहने खड्डय़ांत आदळत आहेत. त्याचबरोबर दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान होत असल्याचे गणोश वाघमारे या वाहानचालकाने सांगितले. त्याचबरोबर दुचाकी स्वारांच्या मान आणि मणक्याला त्रस होत असल्याचे भोलेनाथ विश्वकर्मा या दुचाकीस्वाराने सांगितले. (वार्ताहर)
टोल घेण्यासाठी टोल नाके सज्ज
महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याबाबत उपाययोजना न करता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संगनमताने ठेकेदाराने दोनही बाजूने टोल नाके उभारले असून कोणत्या वाहनांना किती टोल. टोलच्या नियमावलीची फलके लावण्यात आली आहेत. स्थानिकांचा उद्रेक होऊ नये याकरिता संबंधित फलक झाकण्यात आले आहेत. महामार्गाचे कामच अद्याप पूर्ण झाले नाही, जे झाले ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे असे असताना टोल वसुलीची इतकी घाई का असा सवाल उपस्थित होत आहे.
नियोजनाचा अभाव
सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकेदार आणि वाहतूक पोलिसांचा समन्वय नसल्याने वाहतुकींची कोंडी निर्माण होत आहे. संबंधित ठेकेदार कुठे ही रस्ता उखडून काम करीत असून त्याबाबत वाहतूक पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नाही. वाहतूक पोलीस ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे संपर्कात नसल्याने त्याचा त्रस सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणाहून एचपीसीएलची डिङोल वाहिनी गेली आहे त्या लागूनच रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरू असून गुरूवारी चक्क या वाहिनीला गळतीही लागून मोठया प्रमाणात डिङोल वाया गेले.
रोगापेक्षा इलाजच महाभयंकर
वाहतूक कोंडी होऊ नये त्याचबरोबर मुंबई आणि पुणो जलद गतीने गाठता यावा या उद्देशाने शासनाने पनवेल-सायन महामार्गाचे रूंदीकरण केले. मात्र महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनांचा वेग कमी होऊन वाहतूक कोंडी होत आहे. कामोठा आणि कळंबोली परिसरात कोंडी ही नित्याचीच झाली असून याबाबत कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही.