अपहरण केलेल्या चिमुरड्याची सुटका
By admin | Published: February 11, 2017 04:42 AM2017-02-11T04:42:19+5:302017-02-11T04:42:19+5:30
कुर्ला येथून १५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या ७ वर्षांच्या मुलाची सुटका करण्यास नेहरूनगर पोलिसांना यश आले आहे.
मुंबई : कुर्ला येथून १५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या ७ वर्षांच्या मुलाची सुटका करण्यास नेहरूनगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी वाराणसीतून मुलाची सुटका करत आरोपी किशनकुमार लच्छेराम राम याला अटक केली आहे.
कुर्ला पूर्वेकडील पत्राचाळीत हुमायून शेख हे कुटुंबीयांसोबत राहतात. २ फेब्रुवारी रोजी त्यांचा सात वर्षांचा मुलगा फुरकून उर्फ मोहम्मद आफताब सायंकाळी घराबाहेर खेळत होता. सर्वत्र शोधाशोध करून मुलगा न सापडल्याने शेख यांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. मुलगा बेपत्ता झाल्याने नेहरूनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला.
नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कोपर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत माने, साहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उकिर्डे यांची विशेष पथके तयार करून पोलिसांनी कुर्ल्यासह रेल्वे स्थानक परिसरात मुलाचा शोध सुरू केला. हा शोध सुरू असतानाच १५ लाखांच्या खंडणीची मागणी केली. पोलिसांनी या मोबाइल क्रमांकावरून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. हा फोन मध्य प्रदेशातील खाडवा परिसरातून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नेहरूनगर पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशात रवाना करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.
पोलीस आरोपीचा शोध घेत असतानाच पैशांची व्यवस्था झाली आहे का, याची विचारणा करण्यासाठी अपहरणकर्त्याने ४ तारखेला पुन्हा फोन केला. हा फोन वाराणसीमधून केल्याचे समजताच पोलिसांनी या पथकाला मध्य प्रदेशऐवजी वाराणसीला रवाना होण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, अपहरणकर्त्याच्या फोनची वाट पोलीस बघत होते. दुसऱ्या दिवशी त्याचा फोन येताच, एवढ्या मोेठ्या रकमेची जमावाजमव होत असल्याचे शेख यांनी सांगितले. अपहरणकर्त्याने तडजोडीअंती ५ लाख रुपयांवर हा व्यवहार ठरविला. त्यानंतर पैसे घेऊन येण्यासाठी जागा सांगतो, असे शेख यांना सांगितले. ६ तारखेला पुन्हा फोन आला. ठरल्याप्रमाणे ५ लाखांऐवजी साडेपाच लाख घेऊन वाराणसीमधील बनारस येथे या, असे आरोपीने सांगितले. त्यानुसार शेख यांच्यासोबत पोलिसांचे विशेष पथक वाराणसीला रवाना झाले. हे पथक वाटेत असताना मुलाला घेऊन वाराणसी रेल्वे स्थानकात येतो, तुम्ही पैसे तेथेच द्या, असे आरोपीने सांगितले.
वाराणसीतील स्थानिक सिगरा पोलीस ठाण्याच्या दोन अंमलदारांसह नेहरूनगर पोलिसांनी पहाटे साडेचारच्या सुमारास वाराणसी
रेल्वे स्थानकाबाहेर सापळा रचून आरोपी किशनकुमारला ताब्यात घेत, मुलाची सुखरूप सुटका केली. (प्रतिनिधी)