अपहृत चिमुरड्याची सुटका
By admin | Published: January 22, 2017 02:49 AM2017-01-22T02:49:30+5:302017-01-22T02:49:30+5:30
अॅण्टॉप हिल येथून १० हजारांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या चिमुरड्याची सुटका करण्यात अॅण्टॉप हिल पोलिसांना यश आले आहे. त्यांनी शिताफीने आरोपीला गजाआड केले आहे.
मुंबई : अॅण्टॉप हिल येथून १० हजारांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या चिमुरड्याची सुटका करण्यात अॅण्टॉप हिल पोलिसांना यश आले आहे. त्यांनी शिताफीने आरोपीला गजाआड केले आहे. दिलीपकुमार (३४) असे अपहरणकर्त्याचे नाव असून, गुन्हे मालिका पाहून आरोपीने अपहरणाचा डाव आखला होता.
अॅण्टॉप हिल परिसरात १० वर्षांचा रुद्राक्ष आई-वडील आणि मोठ्या भावासोबत राहतो. १९ तारखेला घराबाहेर खेळत असलेला रुद्राक्ष गायब झाला. मुलाचा शोध सुरू असतानाच साडेसहाच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने कॉल करून १० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. घरात दोन वेळच्या जेवणाची बोंब असल्याने, कुटुंबीयांनी तत्काळ अॅण्टॉप हिल पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नासिर शेख यांच्या नेतृत्वात ६ पथके नेमण्यात आली.
आरोपीने रुद्राक्षच्या वडिलांना पैसे घेऊन डहाणूच्या दिशेने बोलावले. तेथे अनोळखी व्यक्तीने इशारा दिला. मात्र, त्याच दरम्यान त्याचे वडील चक्कर येऊन कोसळले. मुलगा सुखरूप हवा असल्याने पोलिसांनी आरोपीला जाऊ दिले, तसेच त्याच्या वडिलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला.
तपास पथकांकडून शोध सुरू असतानाच बी.पी.टी. रेल्वे स्थानकातील शेख मिस्त्री रोड येथील एका जरीच्या कारखान्यातील मजूर दिलीपकुमार दोन दिवसांपासून गावी निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पथकातील पोलीस निरीक्षक सांगळे, गोपाळे आणि फौजदार लिंगे, कुलकर्णी यांनी त्याच्या मित्रांवर पाळत ठेवली. त्यात खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीत तो वापी येथे रवाना होणार असल्याचे समजले. पोलिसांनी साध्या वेशात सापळा रचून दिलीपकुमारला ताब्यात घेत, या मुलाची सुखरूप सुटका केली. अपहरण, तसेच खंडणीच्या गुन्ह्यांत दिलीपला अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
असा रचला
अपहरणाचा कट
अॅण्टॉप हिल परिसरात दिलीप जरीच्या कारखान्यात मजूर म्हणून काम करतो. याच परिसरात तो भाड्याने राहायचा. त्याला गुन्हे मालिका पाहण्याची आवड होती. पैशांची चणचण भासत असल्याने, त्याने गुन्हे मालिकेनुसार अपहरणाचा डाव रचल्याचे तपासात समोर आले.
अंकलने कहाँ तीन घंटा घुमेंगे...
घराबाहेर खेळत असताना दिलीपने रुद्राक्षला चॉकलेटचे आमिष दाखवून सोबत नेले. अशात ‘अंकलने कहाँ तीन घंटा घुमेंगे.. ’ म्हणून आपण सोबत गेल्याचे रुद्राक्षने पोलिसांना सांगितले.
दिलीपने सुरुवातीला रिक्षाने गोवंडी, त्यानंतर लोकलमधून त्याला फिरवले. शुक्रवारी रात्री वापीसाठीची टे्रन पकडणार, त्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्या तावडीतून मुलाची सुटका केली.