अपहृत चिमुरडीची सुटका
By admin | Published: April 10, 2015 04:27 AM2015-04-10T04:27:53+5:302015-04-10T04:32:38+5:30
ग्रॅन्ट रोडच्या बटाटा चाळ परिसरातून अपहरण झालेल्या दोन वर्षांच्या चिमुरडीची डी.बी. मार्ग पोलिसांनी सुखरूप सुटका केली.
मुंबई : ग्रॅन्ट रोडच्या बटाटा चाळ परिसरातून अपहरण झालेल्या दोन वर्षांच्या चिमुरडीची डी.बी. मार्ग पोलिसांनी सुखरूप सुटका केली. तसेच अपहरणकर्ता संतोष विश्वेकर (२७) असे याला अटक केली. या चिमुरडीला गुजरात, दिल्लीला नेऊन विकणार होतो, अशी कबुली त्याने पोलिसांना दिल्याचे समजते.
संगीता पिल्ले (२) असे सुटका झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. ग्रॅन्ट रोडच्या बटाटा चाळ परिसरातील फुटपाथवर ती आपल्या पालकांसोबत राहते. ६ एप्रिलला सकाळी ती घराबाहेर खेळत होती. मात्र बराच वेळ घरी न परतल्याने पालकांनी तिचा शोध सुरू केला. ती न सापडल्याने अखेर पालकांनी डी.बी. मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा नोंदवून वरिष्ठ निरीक्षक सुरेश हुजबंड यांनी संगीताच्या शोधार्थ चार विशेष पथके तयार केली आणि त्यांना विशिष्ट जबाबदारी सोपवली. याच दरम्यान मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाबाहेर एक तरुण लहान मुलीसोबत बसला आहे. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती खबऱ्याकडून निरीक्षक सरदार पाटील यांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ या तरुणाला व मुलीला ताब्यात घेतले. चौकशीत हीच मुलगी संगीता असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीने स्वत:चे नाव संतोष विश्वेकर सांगितले. तसेच अपहरणाची कबुली दिली. (प्रतिनिधी)