अपहृत चिमुरडीची ‘चौदा’ तासांत सुटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 02:57 AM2018-04-12T02:57:18+5:302018-04-12T02:57:18+5:30
आईसोबत असलेल्या भांडणाचा सूड घेण्यासाठी तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण करत, तिला दहा हजारांना विकण्याचा धक्कादायक प्रकार कांदिवलीत घडला होता.
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : आईसोबत असलेल्या भांडणाचा सूड घेण्यासाठी तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण करत, तिला दहा हजारांना विकण्याचा धक्कादायक प्रकार कांदिवलीत घडला होता. मुख्य म्हणजे या प्रकरणी काहीच माहिती पोलिसांच्या हाती नव्हती. मात्र, सायबर सेलचा दांडगा अनुभव आणि मजबूत नेटवर्कच्या आधारे कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी अवघ्या ‘चौदा’ तासांत तान्ह्या बाळाला त्याच्या आईकडे सुखरूप पोहोचविले. इतकेच नव्हे, तर हे काम करणाऱ्या सहा महिलांचा समावेश असलेल्या सात जणांच्या टोळीलादेखील गजाआड केले.
अशा अनेक गुन्ह्यांची उकल कांदिवली पोलिसांनी केली आहे. कांदिवली पोलीस ठाण्यातील २१३ पोलीस कर्मचारी अधिकारी साडेनऊ लाखांहून अधिक लोकसंख्येची जबाबदारी सांभाळत आहेत. कांदिवली पोलीस ठाण्याचा बराच परिसर हा झोपडपट्टीत मोडतो. या ठिकाणी अत्यंत संवेदनशील भाग म्हणून लालजीपाडा हा परिसर ओळखला जातो. कारण यात हिंदू, मुस्लीम, दलित लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कोणतीही संवेदनशील घटना घडली की, या ठिकाणी पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे आव्हान पेलावे लागते.
>लोकसहभागाचा फायदा : कांदिवली पोलीस ठाण्याचे प्रमुख मुकुंद पवार यांचा सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असतो. विविध संस्था, संघटना यांच्यामार्फत ते स्थानिकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करतात. यातून पोलीस आणि सामान्य नागरिक यातील गैरसमज दूर होऊन, एखाद्या समस्येवर उपाययोजना करणे सोपे होते. त्यातच सर्वच सणांमध्ये पवार आणि त्यांचे कर्मचारी सहभागी होतात, तसेच सामाजिक जनजागृतीवर विशेष लक्ष असते. यात ‘पोलीस दीदी’ या उपक्रमाचा सहभाग आहे, तसेच कांदिवली पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी ग्रंथालय आणि अभ्यासिकेचे उद्घाटन मुंबई पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
महत्त्वाची प्रकरणे :
तीन वर्षांपूर्वी आर्टिस्ट हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरेश भांबानी यांची हत्या करून, त्यांचे मृतदेह पोईसर नाल्यात फेकण्यात आले होते. त्यातील एक वगळता सर्व आरोपींच्या मुसक्या कांदिवली पोलिसांनी आवळल्या आहेत.
स्वयंघोषित गुरू राधे माँ हिच्यावर निकी गुप्ता या गृहिणीने हुंडाबळीचा आरोप केला होता. याची तक्रार कांदिवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
>‘सर्व धर्माचे बांधव आमच्या अखत्यारित राहतात. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे म्हणजे त्यांचे सहकार्य आणि माझ्या सहकाºयांची सकारात्मक भूमिका त्यातच वरिष्ठांचे मार्गदर्शन मला पोलीस ठाण्याची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडण्यासाठी उपयुक्त ठरते.
- मुकुंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कांदिवली पोलीस ठाणे
परिमंडळ -११
लोकसंख्या - ९.५.लाख
पोलीस उपायुक्त - विक्रम देशमाने
बीट चौकी - ४
महावीर नगर, कमला नेहरूनगर, शंकर लेन आणि लालजीपाडा
तक्रारीसाठी संपर्क
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मुकुंद पवार
२८०५०९०४/६६०३