Join us

बिल्डरच्या पुतण्याचे अपहरणकर्ते गजाआड

By admin | Published: April 28, 2015 1:04 AM

नामांकित बिल्डरच्या २१ वर्षीय पुतण्याचे अपहरण करणाऱ्या ९ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मुंबई आणि नाशिकमधून गजाआड केले.

मुंबई : नामांकित बिल्डरच्या २१ वर्षीय पुतण्याचे अपहरण करणाऱ्या ९ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मुंबई आणि नाशिकमधून गजाआड केले. अपहृत मुलाला मुरबाड आणि वणीत सुमारे महिनाभर डांबून या टोळीने त्याच्या कुटुंबाकडून तब्बल २ कोटींची खंडणी उकळली होती. या टोळीला अशाच अपहरणांची व आलिशान कार चोरण्याची पार्श्वभूमी आहे.गोरेगाव पूर्वेकडील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या व मॅकेनिकल इंजिनीअर असलेला अजित अपराज (४०) हा या अपहरणाचा मास्टर माइंड होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी भारतीलाही गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. भारती पेशाने वकील असून खंडणीतली काही रक्कम मार्गी लावणे, अपहरणनाट्यातील पुढचे डावपेच आखणे यात तिचा सक्रिय सहभाग पुढे आला आहे. याशिवाय मनिष गांगुर्डे (२७), दीपक साळवे (२८), अविनाश देठे (२५), विजय वाडले (२५), गणेश कोयंडे (३८), राकेश कनोजिया (३२) आणि गौतम गुप्ता ऊर्फ अब्दुल बेचैन (३०) अशी अन्य अटक आरोपींची नावे आहेत. ११ एप्रिलला रात्री टोळीने विद्याविहारच्या निळकंठ दर्शन या पॉश सोसायटीबाहेरून मुलाचे अपहरण केले. सुरुवातीचे काही दिवस त्याला मुख्य आरोपी अजितच्या फार्महाऊसवर कोंडून ठेवण्यात आले. त्यानंतर काही दिवस शहापूर व वणीतील एका भाड्याच्या खोलीत दडविण्यात आले. दरम्यानच्या काळात ही टोळी मुलाच्या कुटुंबीयांशी मोबाइलद्वारे संपर्कात होती. उत्तर प्रदेशातून आणलेली सिमकार्डे वापरून ही टोळी कुटुंबीयांना फोन करून खंडणीसाठी धमकावत असे. या टोळीने मुलाच्या सुटकेसाठी दोन कोटींची खंडणी मागितली. मुलाचे काका शहरातील प्रसिद्ध बिल्डर असल्याने त्यांनी या रकमेवरून घासघीस केली नाही. १२ एप्रिलला रात्री गोरेगावच्या आरे कॉलनीत कुटुंबीयांनी टोळीला दोन कोटी दिले. त्यानंतर ९ तासांनी टोळीने मुलाची सुटका केली. खंडणीतलेच दोन हजार रुपये खिशात कोंबून टोळीने त्याला नाशिक-मुंबई हायवेवर सोडले. १३ एप्रिलला या मुलाने आपले घर गाठले.खंडणी स्वीकारल्यानंतर सर्व काही ठीकठाक असेल तरच मुलाची सुटका करू, असे या टोळीने स्पष्ट केले होते. त्यामुळे गोरेगावात खंडणी देताना गडबड झाली असती तर कदाचित मुलाच्या जिवाला धोका निर्माण झाला असता. हे लक्षात घेऊन कुटुंबीयांनी पैशांपेक्षा मुलाचा जीव प्यारा असल्याचे सूचित केले होते. त्यामुळे गुन्हे शाखेने गोरेगावची डील होऊ दिलीे. हा मुलगा घरी आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत गुन्हे शाखेला महत्त्वाचा क्ल्यू मिळाला. त्याआधारे अजितसह त्याची संपूर्ण टोळी मुंबई, नाशिकमधून गजाआड झाली. या टोळीकडून सुमारे ९० लाख रोख हस्तगत करण्यात आले. (प्रतिनिधी) च्या टोळीचा म्होरक्या अजित अपराज ऊर्फ साहेब याने आपल्या शाळकरी मित्राच्या ३ वर्षांच्या मुलाचे अपहरण केले होते. या मुलाला चार दिवस डांबून ठेवत अजितने आपल्याच मित्राकडून तब्बल ८१ लाखांची खंडणी उकळली होती.च्जून २०१३मध्ये अजितने गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय असलेल्या व्यावसायिक मित्राचेच अपहरण केले. सुटकेसाठी त्याच्या कुटुंबाकडून १२ लाखांची खंडणी उकळली. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये अजितचा सहभाग अखेरपर्यंत उघड झाला नव्हता.च्२०११ ते आतापर्यंत अजित व त्याच्या टोळीने मुंबई, ठाणे व नवीमुंबईतून पाच इनोव्हा कार चोरल्या आहेत. या कार आधी त्याने भाडयाने घेतल्या. प्रवासादरम्यान ड्रायव्हरला गुंगीचे औषध देऊन, मधल्यामध्ये उतरवून अजित व टोळी कार चोरे. यातल्या एका प्रकरणात टोळीने चालकाची हत्या केल्या संशय गुन्हे शाखेला आहे.तपास करणारे पथकगुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. मोहन दहिकर, एसीपी प्रफुल्ल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जबरी चोरी व दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक अशोक खोत, युनिट सहाचे वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद काळे, युनिट सातचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण तेजाळे, प्रिनाम परब, एपीआय अनिल ढोले, विजय ढमाळ, घाग, पुराणिक, शिंदे, पवार, भापकर आणि पथकाने ही कामगिरी केली.