अपहरणकर्त्यांची नजर चुकली अन्...
By admin | Published: September 13, 2014 01:47 AM2014-09-13T01:47:35+5:302014-09-13T01:47:35+5:30
अपहरणकर्त्याची नजर चुकली आणि १२ वर्षांच्या एका मुलाने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली.
मुंबई : अपहरणकर्त्याची नजर चुकली आणि १२ वर्षांच्या एका मुलाने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. गेल्या चार दिवसांपासून अपहरणकर्त्यांच्या तावडीत सापडलेला संदेश पटेल (नाव बदललेले) हा दादर स्थानकात रडत असताना रेल्वे पोलिसांनी पाहिले आणि त्याला विचारणा केली असता सर्व प्रकरण उघडकीस आले. या मुलाला पुन्हा त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशमधील झांसी येथे राहणारा १२ वर्षीय संदेश पटेल इयत्ता सातवीत शिकतो. ८ सप्टेंबर रोजी दुपारी २च्या सुमारास मित्राची वही देण्याकरिता तो घराबाहेर पडला. त्यानंतर एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून चार इसमांनी त्याचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी स्कॉर्पिओतून कल्याण येथे आणले. लोकलने दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ६वर त्याला आणले आणि चारही अपहरणकर्ते चर्चा करण्यात गुंतले. त्याचवेळी संदेश याने या आरोपींची नजर चुकवली आणि तेथून दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ४वर येऊन रडू लागला. त्याचवेळी पोलीस शिपाई दिनेश सावंत आणि विजय शिंदे यांनी संदेशकडे विचारणा केली असता त्याने घडलेली सर्व घटना सांगितली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब बनकर आणि सहायक पोलीस निरीक्षक सदाशिव सावंत यांनी झांसी येथील रेल्वे पोलिसांकडे माहिती मागितली. त्या वेळी झांसी येथील सीपरी बाजार पोलीस ठाण्यात २८४/१४ कलम ३६३ नुसार संदेशच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी त्वरित संदेश सापडल्याचे सीपरी पोलिसांना सांगितले. त्यानंतर तेथील संदेशच्या पालकांशी संपर्क साधण्यात आल्यानंतर मुंबई येथील नातेवाइकांकडे त्याला सुपुर्द करण्यास सांगण्यात आले. याबाबत साहाय्यक पोलीस निरीक्षक सदाशिव सावंत यांनी सांगितले की, मुलगा १२ वर्षांचा असून तो खूप घाबरलेला होता. तरीही त्याची समजूत काढून सगळी माहिती आम्ही मिळवली आणि अपहरणाचे प्रकरण उघडकीस आले. (प्रतिनिधी)