हा तर सर्वसमावेशक देवाच्या अपहरणाचा डाव; शिर्डी जन्मस्थळ वादावरून सत्यजित तांबेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 09:40 AM2020-01-20T09:40:09+5:302020-01-20T09:40:46+5:30
शिर्डी ग्रामस्थांनी रविवारी दिवसभर कडकडीत बंद पाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांबरोबर संवाद साधत बंद मागे घ्यावा व चर्चेला येण्याचे आवाहन केले.
मुंबई : शिर्डीचेसाईबाबा यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 100 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. यावरून साईबाबांचे जन्मस्थळ शिर्डीच असल्याचा दावा शिर्डीकरांकडून करण्यात आला होता. तसेच यासाठी बेमुदत शिर्डी बंद पुकारला होता. ठाकरे यांनी चर्चेला बोलाविल्याने हा बंद तात्पुरता स्थिगित करण्य़ात आला असून काँग्रेसचे नेते सत्य़जित तांबे यांनी हे सरळ साधे प्रकरण नाही. सर्वसमावेशक देव, प्रतीकं यांचं अपहरण करण्याचा हा डाव असल्याचा आरोप केला आहे.
शिर्डी ग्रामस्थांनी रविवारी दिवसभर कडकडीत बंद पाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांबरोबर संवाद साधत बंद मागे घ्यावा व चर्चेला येण्याचे आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत रात्री १२नंतर शिर्डी बंद तात्पुरता मागे घेण्यात येत असल्याची घोषणा शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी शिर्डीकरांच्या ग्रामसभेच्या मान्यतेने केली.
तर यावर सत्यजित तांबे यांनी मत प्रदर्शन करताना, शिर्डी विरुद्ध पाथरी हा वाद फक्त आर्थिक नाही. साईबाबा हे सर्वसमावेशक संत, देव मानले जातात. विसाव्या शतकात हा लोकांनी त्यांच्यासाठी निर्माण केलेला सर्वधर्मी देव आहे. त्यांचं जन्मगाव, त्यांचा धर्म आणि त्यांची जात याबद्दल दावे केले जात आहेत. बाबांनी त्यांच्या हयातीत ते कोण, कुठले ही माहिती कुणालाही दिली नव्हती. उलट "मी सर्वांचा आहे" हे त्यांनी सांगितलं. लोकांनाही ते पटलं. आता 21व्या शतकात त्यांची जात, धर्म याबद्दल दावे केले जात आहेत. हे सरळ साधे प्रकरण नाही. सर्वसमावेशक देव, प्रतीकं यांचं अपहरण करण्याचा हा डाव आहे, असा आरोप ट्विटरवर केला आहे.
रविवारी शिर्डी कडकडीत बंद होती. फुला-हारांची दुकाने बंद असल्याने भाविकांची काही प्रमाणात गैरसोय झाली. रविवारी साईभक्त व ग्रामस्थांनी शहरातून सद्भावना परिक्रमा रॅली काढली. त्यामध्ये शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थही सहभागी झाले. पंचक्रोशीतील २५ गावांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. हा वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांना सोमवारी दुपारी चर्चेसाठी मुंबईला बोलावले आहे. दुपारी दोन वाजता मुख्यमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होईल. शिर्डी ग्रामस्थ, साई संस्थानचे अधिकारी, पाथरी येथील कृती समितीचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील. मात्र, या बैठकीचे निमंत्रण मिळाले नसल्याचे पाथरी येथील कृती समितीने म्हटले आहे.