Join us  

निवडणुकीमुळे टळली ‘बेस्ट’ची भाडेवाढ

By admin | Published: October 06, 2016 4:55 AM

परिवहन तूट वसुली बंद करण्यात येणार असल्याने आधीच संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाचे आर्थिक गणित कोलमडले आहे़

मुंबई : परिवहन तूट वसुली बंद करण्यात येणार असल्याने आधीच संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाचे आर्थिक गणित कोलमडले आहे़ मात्र पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने तिकिटांच्या दरामध्ये वाढ करण्यास शिवसेना- भाजपा युतीने या वर्षी टाळले आहे़ त्यामुळे कर्मचाऱ्यांना मात्र दिवाळीतील सानुग्रह अुनदानावर पाणी सोडावे लागणार आहे़बेस्ट उपक्रमाचा सन २०१७-२०१८ चा अर्थसंकल्प बेस्ट महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष मोहन मिठबावकर यांना बुधवारी बेस्ट भवनमध्ये सादर केला़ आगामी आर्थिक वर्षात बेस्ट उपक्रमात ५६५़७४ कोटी रुपये तूट या अर्थसंकल्पातून दर्शविण्यात आली आहे़ तर भांडवली खर्चाकरिता २४६़५८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ मेट्रो, मोनो, शेअर रिक्षा-टॅक्सीमुळे बेस्टच्या प्रवाशांमध्ये प्रचंड घट झाली आहे़ याचा फटका उत्पन्नाला बसल्याने गेल्या दीड वर्षात बेस्टने तीन वेळा भाडेवाढ केली़ मात्र पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असून बेस्ट समिती भाजपाच्या ताब्यात आहे़ ऐन निवडणुकीच्या काळात भाडेवाढ करून भाजपाला नागरिकांचा रोष ओढावून घ्यायचा नाही़ त्यामुळे प्रवाशांना या वेळी दिलासा देण्यात आला आहे़वेतनावरील खर्च वाढलाकोणत्याही प्राधिकरणाचा उत्पन्नाचा सर्वाधिक टक्का हा आस्थापनावर खर्च होत असतो़ बेस्ट उपक्रमात ४४ हजार कर्मचारी-अधिकारी आहेत़ त्यांच्या वेतनावर आतापर्यंत ७० ते ८० कोटी खर्च होत होते़ यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढ होऊन १२५ कोटींवर हा खर्च पोहोचला आहे़सानुग्रह अनुदान नाहीदिवाळीमध्ये दरवर्षी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची प्रथा आहे़ मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अर्थसंकल्पात बेस्टने या अनुदानाची तरतूद केलेली नाही़ त्यामुळे कर्मचाऱ्यांना या वर्षी सानुग्रह अनुदान मिळणार नाही, अशी चिन्हे आहेत़टीडीएलआरमुळे वाढली तूटपरिवहन तूट वसुली म्हणजेच टीडीएलआर गेल्या काही वर्षांपासून शहर भागातील बेस्टच्या वीज ग्राहकांकडून वसूल करण्यात येत आहे़ या वसुलीतूनच बेस्ट उपक्रम आपल्या परिवहन खात्याची तूट काही प्रमाणात भरून काढत होते़ मात्र यावर नागरिकांनी आक्षेप घेतला आहे़ तसेच हे प्रकरण न्यायालयातही दाखल झाले. त्यानुसार ही तूट वसुली आता बंद करण्यात येणार आहे़ त्यामुळे बेस्टची आर्थिक बाजू आणखी कमकुवत झाली आहे़ई-प्रसाधनगृहेबेस्टचे २०० बस टर्मिनल आहेत़ बसस्थानके, बस चौक्या आणि रोख भरणा केंद्र येथे प्रवासी व वीजग्राहक, कर्मचारी आणि महिलांसाठी ई-प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत़ बेस्टच्या दक्षिण मुंबईतील जुन्या उपकेंद्रांमध्ये आग लागण्याचा धोका संभवतो़ त्यामुळे बॅकबे, नरिमन पॉइंट, खेतवाडी आणि डॉ़ बी़ए़ मार्ग येथील उपकेंद्रांमध्ये ११० के़व्ही़ केबलच्या संरक्षणाकरिता संपूर्ण स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा खरेदी करण्यात येणार आहे़ या यंत्रणेमुळे तळघरातील आणि वरील मजल्यावरील जीआयएस टर्मिनसमधील आग विझविण्याकरिता या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकेल़बेस्ट उपक्रमामध्ये ३८६६ बसगाड्यांचा ताफा आहे़ तर ५०६ बसमार्ग आणि २७ बस आगार आहेत़ बेस्ट उपक्रम यामध्ये सुधारणा करणार आहे़ मात्र ही सुधारणा करताना बऱ्याच ठिकाणी मॅन्युअल काम बंद करून संगणकीकृत करण्यात येणार आहे़ बेस्ट उपक्रम आधीच तोट्यात असल्याने कर्मचारी संख्या कमी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही़ मात्र या सुधारणेनंतर एकाही कर्मचाऱ्याला कमी करणार नाही, असे महाव्यवस्थापकांनी स्पष्ट केले़महापालिकेकडे अनुदान मागणार : बस मार्गांमध्ये बदल, बस फेऱ्या आणि बसगाड्यांचे नियंत्रण यासाठी एकात्मिक उपाययोजना पालिका करणार आहे़ याकरिता सल्लागार नेमण्यात येणार असून त्यासाठी २५ कोटी रुपयांची गरज आहे़ बस आगार विकास आणि एकात्मिक योजनेसाठी आवश्यक १२५ कोटी रुपये देण्याची मागणी बेस्ट महापालिकेकडे करणार आहे़ त्याचबरोबर तूट भरून काढण्यासाठी बेस्ट महापालिकेकडून अनुदान मागणार आहे़ यापूर्वी बेस्टने १६०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज महापालिकेकडून घेतले होते़मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे असल्याने याचा फटका वाहतुकीला बसत आहे़ वाहतूककोंडीमुळे बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांना लेटमार्क लागत आहे़रस्त्यांवरील खड्ड्यांतून बस चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ त्यामुळे बसगाड्यांचे नुकसान होत असून देखभालीवरील खर्च वाढला आहे़जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये आठ कोटी रुपये बेस्ट उपक्रमाने खड्ड्यांमुळे गाड्यांवर खर्च केले आहेत़बेस्टच्या तिजोरीला आठ कोटींचा ‘खड्डा’मुंबई : मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांनी बेस्ट उपक्रमाचे आर्थिक नुकसान केले आहे़ पावसाळ्यात आधीच वाहतुकीची गती मंद असताना खड्ड्यांमुळे बसगाड्या बंद पडणे, गाड्यांच्या देखभालीचा खर्च वाढणे, असे प्रकार वाढले आहेत़ त्यामुळे गेल्या चार महिन्यांत बेस्टला आठ कोटींचा फटका बसला आहे बेस्ट समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत ही धक्कादायक बाब समोर आली. पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांची चाळण होते़ हे दुखणे दरवर्षीचेच असले तरी यंदा पावसाने अधिक काळ मुक्काम केल्यामुळे मुंबईत खड्ड्यांची संख्या वाढली.या खड्ड्यांमुळे बेस्ट उपक्रमाने काही ठिकाणचे बसमार्ग वळविले आहेत. विशेष म्हणजे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींचे निवासस्थान असलेल्या वांद्रे टाटा कॉलनीत खड्ड्यांमुळे बस चालविणे बेस्टने बंद केले आहे़ ही समस्या एका वॉर्डपुरती नसून मुंबईत सर्वत्रच खड्डे असल्याने बेस्ट उपक्रमाला जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत आठ कोटी रुपयांचा भुर्दंड बसल्याचे काँग्रेसचे रवी राजा यांनी बैठकीत निदर्शनास आणले़२७ बस आगारांच्या इमारतींचे बांधकाम जुने असल्याने त्या धोकादायक झाल्या आहेत़ त्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीकरिता मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने बस आगारांचा पुनर्विकास करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे़ मात्र एका बस आगाराच्या विकासासाठी सुमारे शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ तीन वर्षांमध्ये आगाराचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे़ यासाठी पहिल्या वर्षात २० कोटी रुपये, दुसऱ्या वर्षी ४० आणि तिसऱ्या वर्षात ४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे़