मुंबई : प्रवासी भाड्यात कपात झाल्यानंतरही बस फेऱ्या कमी असल्याने मुंबईकरांना बस थांब्यांवर तिष्ठत राहावे लागत होते. याचे तीव्र पडसाद बेस्ट समितीच्या बैठकीत उमटले होते. त्यानंतर आता वातानुकूलित व विना वातानुकूलित मिनी आणि मिडी ५५ बसगाड्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. १२ बस मार्गांवर या बसगाड्या बेस्टने सुरू केल्या आहेत.
जुलै महिन्यात बेस्ट उपक्रमाने मोठी भाडेकपात केली. यामुळे प्रवाशांची संख्या दहा लाखांनी वाढली, त्याचवेळी बस गाड्यांची संख्या मात्र कमी होत आहे. त्यात पुढील वर्षभरात आणखी शेकडो बसगाड्या वयोमर्यादेनुसार भंगारात निघणार आहेत. बस ताफा कमी होत असल्याने त्याचा परिणाम बस फेऱ्यांवर होत आहे. एक हजार बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव विधानसभा निवडणुकीपूर्वी बेस्ट समितीमध्ये घाईघाईने मंजूर करण्यात आला होता. यापैकी शंभर बसगाड्याही बेस्टच्या ताफ्यात न आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी ५५ मिनी व मिडी वातानुकूलित बस तातडीने ताफ्यात घेण्यात आल्या आहेत.
या बसगाड्या विविध बस मार्गांवर नुकत्याच सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या मिनी वातानुकूलित बस १२ बसमार्गांवरून सुरू करण्यात आल्या आहेत. ए ५४ व ए ५५ - कोहिनूर पी.पी.एल. मार्गे सिद्धिविनायक मंदिर, ए १२२ बॅलार्ड पियर ते चर्चगेट स्थानक दरम्यान, ए १६७ प्रभादेवी स्थानक ते कॉम्रेड प्र. कृ. कुरणे चौक वरळी, ए ३५२- राणी लक्ष्मीबाई चौक शीव ते ट्रॉम्बे हे मार्ग सुरू केले आहेत. तसेच अंधेरी स्थानक पश्चिम येथून ए २२१ - जुहू विले पार्ले बस स्थानक, ए २३५ व ए २४२ मॉन्जिनीस केक शॉप, ए २४९ व ए २५१ सात बंगला बस स्थानक, ए - २४८ रमेश नगर व ए - २५४ वीरा देसाई मार्ग करिता सुरू करण्यात आल्या आहेत.