पूर्व उपनगरातील टेकड्यांवरील वस्त्यांची भागणार तहान

By जयंत होवाळ | Published: December 18, 2023 07:44 PM2023-12-18T19:44:23+5:302023-12-18T19:45:23+5:30

घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुपला दिलासा; पालिका उभारणार भूमिगत टाक्या आणि पम्पिंग स्टेशन,८९ कोटींचा प्रकल्प.

hill settlements in the eastern suburbs will suffer from thirst | पूर्व उपनगरातील टेकड्यांवरील वस्त्यांची भागणार तहान

पूर्व उपनगरातील टेकड्यांवरील वस्त्यांची भागणार तहान

जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पूर्व उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडूप भागातील टेकडीवर राहणाऱ्या रहिवाशांची पाणी टंचाई पासून लवकरच मुक्तता होणार आहे. या भागांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पालिका  २२ लाख लिटर क्षमतेची पाण्याची भूमिगत टाकी, पंपिंग स्टेशन बांधणार असून नव्या जलवाहिन्या टाकून पाणी पुरवठा सुरळीत करणार आहे. या प्रकल्पासाठी पालिका ८९ कोटी ४२ लाख ३१ हजार १९६ रुपये खर्च करणार आहे. भूमिगत पाण्याच्या टाकीतून आनंद गड, पंचशील सोसायटी, राम नगर परिसरात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुपच्या काही भागात डोंगराळ वस्त्या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरी वस्ती आहे. मात्र ही  ठिकाणे उंचावर असल्याने वर्षनुवर्षं या भागातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. डोंगराळ वस्त्या असल्याने पाण्याला पुरेसा दाब नसतो. त्यामुळे पाणी वर चढत नाही. टेकडीवर राहणार्यांना खाली उतरून पाणी आणण्याचे कष्ट घ्यावे लागतात. नव्या प्रकल्पामुळे भविष्यात ही समस्या दूर होईल, अशी अपेक्षा आहे.

घाटकोपर, विक्रोळी भांडुप येथील जुन्या जल वाहिन्या बदलत विविध व्यासाच्या नवीन जल वाहिन्या टाकण्यात येणार आहे. विक्रोळी पार्क साईट सी कॉलनी जवळील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात २२ लाख लिटर पाण्याची क्षमता असलेली भूमिगत पाण्याची टाकी बांधण्यात येणार असून टाकीत पाणी साठवण करण्यासाठी विविध व्यासाच्या नवीन जल वाहिन्या टाकण्यात येणार आहे. तसेच पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे.

पूर्व उपनगरातील परिमंडळ - सहामधील घाटकोपर (पश्चिम) विक्रोळी (पश्चिम) येथील डोंगरावर असलेल्या आनंदगड, पंचशिल सोसायटी व राम नगर परिसरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन जल वाहिन्या .पूर्व उपनगरातील परिमंडळ - ६ मधील भांडुप जलाशयापासून घाटकोपर भांडुप विभागातील पाणीपुरवठ्याचे विभाजन करण्यासाठी लाल बहाहूर शास्त्री मार्गावर ९०० - ७५० मिमि व्यासाची जल वाहिनी . घाटकोपर (पश्चिम) व विक्रोळी (पश्चिम) येथील  लोवर डेपो पाडा - सागर नगर या उंचावर वसलेल्या लोकवस्तीसाठी पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी विविध व्यासाच्या जलवाहिन्या टाकणे, बदलण्याचे काम .
 
घाटकोपर विक्रोळी नवीन जल वाहिन्या , भूमिगत पाण्याची टाकी - ४७,०६,८५,८८५  रु.
घाटकोपर भांडूप नवीन जल वाहिन्या  - ३४,१५,८९,९६० रु.
 घाटकोपर विक्रोळी टेकडीवर  नवीन जल वाहिन्या - ८,१९,५५, ३५१ रु.

Web Title: hill settlements in the eastern suburbs will suffer from thirst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी