मुंबई : पुलाच्या नियमित देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पादचारी पुलाचा सांगाडा गंजून वेल्डिंग तुटले. पुलाची नाजूक स्थिती निदर्शनास आणण्यात स्ट्रक्चरल आॅडिट कंपनीनेही निष्काळजीपणा केला. त्यातच ‘ए’ विभाग कार्यालयाने केलेले सुशोभीकरण आणि पुलावरील पादचाऱ्यांचा भार वाढल्यामुळे हा पूल कोसळल्याचा ठपका पालिकेच्या दक्षता विभागाने आपल्या अहवालातून ठेवला आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा हिमालय पूल मार्च महिन्याच्या १४ तारखेला कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. तर ३० पादचारी जखमी झाले होते. या दुर्घटनेची प्राथमिक चौकशी पालिकेने काही तासांत पूर्ण करून पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करणारी कंपनी, पूल दुरुस्त करणारा ठेकेदार आणि तीन अभियंते व दोन निवृत्त अभियंत्यांवर ठपका ठेवला. पोलिसांनी पूल विभागाचे तत्कालीन प्रमुख अभियंता एस.ओ. कोरी यांच्यासह तिघांना अटक केली आहे. स्ट्रक्चरल आॅडिटर नीरज कुमार देसाई यालाही अटक करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले होते.दक्षता विभागाने केलेल्या या चौकशीचा अहवाल आयुक्त प्रवीण परदेशी यांना नुकताच सादर करण्यात आला आहे. यामध्ये पूल गंजून वेल्डिंग तुटल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. ब्रिज मॅन्युअलनुसार दर तीन महिन्यांनी पुलांची तपासणी होणे बंधनकारक आहे. मात्र, अशा प्रकारची तपासणी झालेली नाही. पुलाची योग्य प्रकारे देखभालही करण्यात आलेली नाही, असा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. मात्र या अहवालात कोणत्याही नवीन नावाचा समावेश नाही. या दुर्घटनेची पुढील तपासणी उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.अहवालात नवीन कोणत्याही अधिकाºयाचे नाव समोर आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात नवनियुक्त आयुक्त प्रवीण परदेशी आता काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आतापर्यंतची कारवाईतत्कालीन प्रमुख अभियंता शितला प्रसाद कोरी, कार्यकारी अभियंता ए.आर. पाटील, साहाय्यक अभियंता एस.एफ. काकुळते यांना अटक.स्ट्रक्चरल आॅडिटर नीरजकुमार देसाई याला अटक. २०१२-१३ मध्ये पुलाची दुरुस्ती करणाºया ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस.परवानगीशिवाय सुशोभीकरणदेखभालीअभावी पुलाचा लोखंडी सांगाडा गंजला होता. त्यातच काही वर्षांपूर्वी ए प्रभागाने या पुलाचे सुशोभीकरण केले. यासाठी पूल विभागाची परवानगी घेण्यात आली नव्हती.रेल्वेनेही १८ क्र मांकाच्या फलाटाशी हा पूल जोडला होता. त्यामुळे पुलावरील भार वाढून यात भर पडली, असेही या अहवालात नमूद आहे.पूल विभागाने जबाबदारी योग्य प्रकारे पार न पाडल्याने ही दुर्घटना घडली असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
सुशोभीकरणासह पादचाऱ्यांच्या वाढलेल्या भारामुळेच कोसळला हिमालय पादचारी पूल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 2:01 AM