तपासणीतील दुर्लक्षामुळेच हिमालय पूल कोसळला, महापालिकेच्या दक्षता विभागाचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 05:35 AM2020-07-18T05:35:58+5:302020-07-18T05:36:18+5:30
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोसळलेला हिमालय पूलही अशाच निष्काळजीपणाचा एक भाग होता.
मुंबई : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वेळोवेळी निष्पाप लोकांना जीव गमवावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोसळलेला हिमालय पूलही अशाच निष्काळजीपणाचा एक भाग होता. पुलाच्या नियमित देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पादचारी पुलाचा सांगाडा गंजून वेल्डिंग तुटले. पुलाची नाजूक स्थिती निदर्शनास आणण्यात स्ट्रक्चरल आॅडिट कंपनीनेही बेपर्वाई केली. त्यातच ए विभाग कार्यालयाने केलेले सुशोभीकरण आणि पुलावरील पादचाऱ्यांचा भार वाढल्यामुळे हा पूल कोसळल्याचा ठपका महापालिकेच्या दक्षता विभागाने आपल्या अहवालातून ठेवला. त्यानुसार पोलिसांनी अटक केलेल्या चौघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेले महापालिकेचे तांत्रिक सल्लागार नीरज देसाई यांच्याविरोधात ९ मे रोजी आझाद मैदान पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात पहिले आरोपपत्र सादर केले. देसाई यांच्या कंपनीला महापालिकेने २०१६ मध्ये हिमालयसह शहरातील ७६ पुलांच्या संरचनात्मक तपासणीचे कंत्राट दिले होते. २०१८ मध्ये देसाई यांनी हिमालय पूल सुस्थितीत असून किरकोळ डागडुजी आवश्यक असल्याचा अहवाल पालिकेला दिला होता. मात्र गेल्या वर्षी पूल कोसळला. त्यात ६ जण ठार तर ३१ जण जखमी झाले. या अपघातानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवत आझाद मैदान पोलिसांनी पूल उभारणीपासून अपघातापर्यंतचा सर्व इतिहास तपासला. त्यात देसाई यांच्या कंपनीने केलेली संरचनात्मक तपासणी सदोष आढळली. तपासणी निकषांनुसार, पालिकेच्या नियमांनुसार केली नव्हती, असेही साक्षीदारांचे जबाब, पालिकेकडील कागदपत्रांवरून स्पष्ट झाल्याचे या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
संरचनात्मक तपासणी चुकीच्या पद्धतीने केल्यास किंवा चुकीचा अहवाल, निष्कर्ष दिल्यास पूल कोसळू शकेल, जीवितहानी होऊ शकेल याची जाणीव देसाई यांना होती. मात्र त्यांनी हलगर्जीपणे सदोष तपासणी केली, असे या आरोपपत्रात नमूद आहे. या आरोपांना स्पष्ट करणारे १६४ साक्षीदारांचे जबाब ७०९ पानी आरोपपत्रात आहेत. त्यात प्रत्यक्षदर्शी म्हणून टॅक्सी चालक, पुलाखालील दुकानदाराचा उल्लेख आहे. जीओ डायनामिक्स कंपनीचे प्रमुख रवी वैद्य यांच्याही जबाबाचा आरोपपत्रात समावेश आहे. त्यापाठोपाठ ३१ मे २०१९ रोजी अटकेत असलेले तत्कालीन प्रमुख अभियंता शीतला प्रसाद कोरी, कार्यकारी अभियंता ए.आर. पाटील, साहाय्यक अभियंता एस.एफ. काकुलते यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.
या घटनेनंतर पालिका प्रशासनाकड़ून २०१२-१३ मध्ये पुलाची दुरुस्ती करणाºया ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच मुंबई शहर व पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पुलांचे पुन्हा आॅडिट करण्यात आले.
‘नियमांकडे दुर्लक्ष’
पुलाच्या तळाच्या भागाची पाहणी आणि नॉन डिस्टिक्टिव्ह चाचणी करण्यात आली नव्हती. चाचणीची जबाबदारी देसाई यांनी गुजरातच्या जिओ डायनामिक्स कंपनीला दिली होती. कंपनीने चाचणी केली तेव्हा देसाई, त्यांच्या कंपनीचे अभियंते किंवा पालिकेच्या अभियंत्यांपैकी कोणीही तेथे उपस्थित नव्हते. मुळात संरचनात्मक तपासणी करताना पुलाखालील वाहतूक पूर्णपणे बंद करणे आवश्यक होते. हा नियम देसाई यांनी पाळला नाही, असे तपासातून स्पष्ट झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.