हिमालय पूल चढा बिनधास्त; सरकता जिना अखेर सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 10:26 AM2024-04-10T10:26:36+5:302024-04-10T10:27:41+5:30
हिमालय पुलाचा सरकता जिना अखेर मंगळवारी पालिका प्रशासनाकडून खुला करण्यात आला आहे.
मुंबई : आचारसंहितेच्या कारणास्तव काम पूर्ण होऊनही रखडलेला हिमालय पुलाचा सरकता जिना अखेर मंगळवारी पालिका प्रशासनाकडून खुला करण्यात आला आहे.
सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पादचारी पूल ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि महिलांनाही विनासायास वापरता यावा, यासाठी मुंबई महापालिकेकडून तिथे सरकता जिना तयार करण्यात आला. मात्र, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर २ आठवडे उलटूनही तो प्रवाशांच्या सेवेसाठी खुला केला नव्हता. अखेर ‘हिमालयचा जिना हलेना, आचारसंहितेपुढे काही चालेना’ या शीर्षकाखाली सोमवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पालिकेने जिना तातडीने सुरू केला. यामुळे आता हिमालय पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय टळणार आहे.
लोकहिताची कामे सुरू करण्यासाठी आचारसंहितेची आडकाठी कधीच व्हायला नको याचे उदाहरण देत ‘लोकमत’च्या मंगळवारच्या वृत्तात पालिका प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले होते. हिमालय पुलाच्या पुनर्बांधणीनंतरही सुरू न झालेल्या सरत्या जिन्यामुळे ज्येष्ठ, वृद्ध आणि गरोदर महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
गैरसोय टळणार-
नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी होती. सध्या सुरू असलेला एक जिनाही अरुंद असून, सकाळी-सायंकाळी तसेच पावसात त्याचा वापर करताना अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे सरकत्या जिन्याची प्रतीक्षा नागरिकांना होती. आता गैरसोय टळणार आहे.