Join us

द हिमालयन क्लबला १९ हजार ८९८ फूट उंचीच्या अनामिक शिखरावर प्रथम आरोहण करण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:06 AM

मुंबई : द हिमालयन क्लब, मुंबईच्या संघाने दिव्येश मुनी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या गिर्यारोहण मोहिमेत हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिती भागातील ...

मुंबई : द हिमालयन क्लब, मुंबईच्या संघाने दिव्येश मुनी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या गिर्यारोहण मोहिमेत हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिती भागातील कर्चा नाला, ग्युन्दी खोरे व बारा शिग्री हिमनदीच्या संगमावर असलेल्या ६०६५ मीटर (१९,८९८ फूट) उंचीच्या अनामिक शिखरावर प्रथम आरोहण करण्यात यश मिळवले आहे.

६ ऑगस्ट रोजी लाहौल भागातील बातल येथून कर्चा नाल्याच्या सर्वांत पश्चिमेकडच्या हिमनदीमार्गे या मोहिमेची शिखराकडे वाटचाल चालू झाली. तळछावणीनंतर त्याहून उंचावर एकूण तीन छावण्या उभारून शिखर चढाई करण्यात आली. २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी राजेंद्र शिंदे, अतीन साठे आणि राजेश गाडगीळ यांनी लेंडूप भूटिया, फुपू शेर्पा व विपीन शर्मा यांच्या साथीने शिखरमाथ्यावर पाऊल ठेवले. विनिता मुनी व राकेश कुमार तसेच पेम्बा शेर्पा यांनी या चढाईत महत्त्वाचे सहकार्य केले.

हिमवृष्टीसह वादळी वारे, धोकादायक नाले व भुसभुशीत दगडमातीच्या प्रदेशातील चढाई अशा आव्हानांचा सामना करीत शिखराच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर प्रत्यक्ष शिखरचढाई करताना सुट्या दगडमातीचे व कठीण बर्फाचे खडे चढ पार करावे लागले. चढाई सुरक्षित करण्यासाठी वाटेत जवळजवळ ४५० मीटर दोर लावावा लागला.

या शिखरावर झालेली ही पहिलीच चढाई आहे. या शिखराच्या माथ्याकडे जाणारी शिखरधार आणि तिच्या दोन्ही बाजूंना पसरलेल्या हिमनद्या यांमुळे वरून पाहिले असता एखाद्या पंख पसरलेल्या फुलपाखराप्रमाणे या शिखराचा आकार दिसतो. लाहौली बोलीभाषेत फुलपाखराला ‘फ्यांलबते’ म्हणतात. त्यामुळे या शिखराचे नाव ‘फ्यांलबते’ शिखर ठेवले जावे, अशी सूचनादेखील करण्यात आली आहे.