हिमालय पादचारी पूल 2022 अखेरीस होणार खुला, पादचाऱ्यांना मिळणार दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 03:27 AM2021-03-30T03:27:27+5:302021-03-30T03:28:46+5:30
पुरातन वास्तू समितीच्या शिफारशी व सूचनांनुसार आराखड्यात आवश्यक बदल केल्यानंतर आता हिमालय पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई : पुरातन वास्तू समितीच्या शिफारशी व सूचनांनुसार आराखड्यात आवश्यक बदल केल्यानंतर आता हिमालय पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मार्च २०१९ मध्ये कोसळलेल्या या पुलाचे काम लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे. त्यामुळे २०२२ वर्षाच्या अखेरीस हा पूल पादचाऱ्यांसाठी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
१४ मार्च २०१९ राेजी छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाेडणारा हिमालय पादचारी पूल काेसळला. या दुर्घटनेत सात प्रवासी मृत्युमुखी पडले. दुर्घटनेनंतर या पुलाचा उर्वरित सांगाडाही धाेकादायक ठरल्यामुळे महापालिकेने पाडला. या मार्गावर दरराेज दाेन्ही बाजूने वाहतूक सुरू असते. मात्र, सबवेतून जायचा वेळ वाचविण्यासाठी बऱ्याचवेळा प्रवासी रस्ता ओलांडत असल्याने अपघाताचा धाेका वाढला. त्यामुळे प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी पूल लवकरात लवकर बांधण्याची मागणी केली जात होती. मात्र, हा पूल टाईम्सची इमारत आणि अंजुमन ए इस्लाम या पुरातन वास्तूंच्या शेजारी आहे. त्यामुळे पूल उभारणीचा या वास्तूंना काही धाेका निर्माण हाेईल का? यासाठी पुरातन वास्तू समितीची मंजुरी घ्यावी लागणार होती. अखेर समितीने सुचवलेले काही आवश्यक बदल केल्यानंतर पूल पुनर्बांधणीचा अंतिम आराखडा तयार झाला आहे. डॉ. डी. एन. मार्ग हा गजबजलेल्या रस्त्यापैकी एक असल्याने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार नाही. मात्र, मार्ग वळवून पूल बांधण्यात येणार असल्याचे पूल विभागातील सुत्रांनी सांगितले.
पुनर्बांधणीसाठी सहा कोटींचा खर्च
या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी सहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर पूल बांधण्याचा कालावधी १५ महिन्यांचा असेल. यामध्ये पावसाळ्यातील चार महिने वगळण्यात येणार असल्याने २०२२ अखेरीस पुलाचे काम पूर्ण होईल. पूल पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यापूर्वी डॉ. डी. एन. राेडवरून दरराेज किती? गाड्या जातात, सीएसटीएम स्थानकात दरराेज येणारे प्रवासी किती?, याचा अभ्यास करण्यात आला होता.पालिकेच्या आराखड्यानुसार या पुलावर येण्या - जाण्यासाठी तीन मार्ग असतील. यापैकी दोन मार्ग डी. एन. रोडच्या दिशेने, तर एक सेंट झेवियर्स महाविद्यालयाकडे जाणाऱ्या सर्विस रोडच्या दिशेला असणार आहे.