मुंबई : बोगस ऑडिट अहवाल उघड करणाऱ्या हिमालय पादचारी पुलाने मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आणला. सात निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर सर्व उड्डाणपुलांचे नव्याने ऑडिट करण्यात आले. मात्र महत्त्वाचा या पुलाचे बांधकाम गेले दोन वर्षे रखडले होते. पुरातन वास्तू समितीची मंजुरी आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करीत या पुलाचे बांधकाम आता सुरू होणार आहे. येथील जिन्यांचा भाग जमीनदोस्त करीत या कामाला आता सुरुवात झाली आहे.
१४ मार्च २०१९ राेजी छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाेडणारा हा पादचारी पूल काेसळला. या दुर्घटनेनंतर डॉ. डी. एन. मार्गावर दुतर्फा सिग्नल बसवून रेल्वे प्रवाशांना टाइम्स इमारतीच्या दिशेच्या प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात आला. या मार्गावर दरराेज दाेन्ही बाजूने वाहतूक सुरू असते. परंतु, भुयारी मार्गातून जायचा वेळ वाचविण्यासाठी बऱ्याच वेळा प्रवासी रस्ता ओलांडत असल्याने अपघाताचा धाेका वाढला होता. तसेच हा पूल टाइम्सची इमारत आणि अंजुमन ए इस्लाम या पुरातन वास्तूच्या शेजारी असल्याने पुरातन वास्तू समितीची परवानगी आवश्यक होती. अखेर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने या पुलाच्या बांधकामाला हिरवा कंदील मिळाला आहे.
अशा काही अडचणी....
या पुलाच्या शेजारी अंजुमन ए इस्लाम इन्स्टिट्यूट आहे. येथे सात हजार मुले शिक्षण घेतात. या पुलामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नयेेे, अशी विनंती पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्यानुसार पुलाचे बांधकाम करताना काही किरकोळ बदल केले जाण्याची शक्यता आहे. तसेच या पुलाला सरकते जिने असावेत, अशी सूचना रेल्वे प्रशासनाने केली होती. मात्र देखभालीचा खर्च अधिक असल्याने पालिकेने त्यावर विचार केला नाही, असे सांगण्यात आले.
कसाब पूल अशी होती ओळख....
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या या पुलाचे बांधकाम १९८० मध्ये करण्यात आले होते. रेल्वे फलाटावर जाण्यासाठी या पुलाचे तीन मार्ग होते. त्यामुळे या पुलाचा वापर दररोज १० हजारांहून अधिक प्रवासी करीत असत, असा अंदाज आहे. २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यावेळी अजमल कसाब या अतिरेक्याने या पुलाचा वापर केला होता. तेव्हापासून हा पूल ‘कसाब पूल’ या नावानेच ओळखला जाऊ लागला.
* धोकादायक असलेल्या या पुलाची किरकोळ दुरुस्ती स्ट्रक्चरल ऑडिटर डी.डी. देसाई यांनी सुचवली होती.
* या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व तीनशे पुलांचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यात २९ पूल धोकादायक असल्याचे आढळून आले.
* पूल पुनर्बांधणीबाबत निर्णय घेण्यापूर्वी डॉ. डी.एन. राेडवरून दरराेज किती गाड्या जातात, सीएसएमटी स्थानकात दरराेज येणारे प्रवासी किती? याचा अभ्यास वाहतूक विभागामार्फत करण्यात आला होता.