...म्हणून अपहरण झालेल्या मुलाला घेऊन हिमांशू रॉय पत्रकार परिषदेत आले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 05:28 PM2018-05-11T17:28:47+5:302018-05-11T17:39:50+5:30

पोलीस दलात आणि पत्रकारांच्या वर्तुळात त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से ऐकवले जातात.

Himanshu Roy and Arup Patnaik battle rift between Mumbai police | ...म्हणून अपहरण झालेल्या मुलाला घेऊन हिमांशू रॉय पत्रकार परिषदेत आले

...म्हणून अपहरण झालेल्या मुलाला घेऊन हिमांशू रॉय पत्रकार परिषदेत आले

मुंबई: दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय हे त्यांच्याकडे असलेल्या महत्त्वपूर्ण तपास प्रकरणांमुळे आणि अन्य कारणांमुळे नेहमीच लाईमलाईटमध्ये राहिले. पोलीस दलात आणि पत्रकारांच्या वर्तुळात त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से ऐकवले जातात. त्यापैकी 2011 मध्ये पोलीस दलातील अंतर्गत स्पर्धेतून घडलेला एक प्रसंग चांगलाच लोकप्रिय आहे. त्यावेळी हिमांशू रॉय हे गुन्हे शाखेचे सहआयुक्त होते. तर अरूप पटनायक हे तत्कालीन पोलीस आयुक्त होते. या दोघांमध्ये कुठेतरी सुप्त स्पर्धा सुरू होती. यामुळेच अरूप पटनायक नेतृत्त्व करत असलेली विशेष शाखा आणि हिमांशू रॉय यांच्या गुन्हे शाखेतील चढाओढीचा प्रसंग चांगलाच गाजला.

एप्रिल 2011 मध्ये कर्नित शहा आणि सुफियान या दोन लहान मुलांचे काही दिवसांच्या अंतराने अपहरण झाले होते. या दोन्ही प्रकरणांचा तपास पोलिसांकडून सुरू होता. मात्र, एके दिवशी अरूप पटनायक अपहरण झालेल्यांपैकी कर्नित शहा याला घेऊन थेट पत्रकार परिषदेत आले. साहजिक अरूप पटनायक यांच्या विशेष शाखेला या प्रकरणाचा छडा लावण्याचे श्रेय मिळाले. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या प्रकरणात गुन्हे शाखेचाही सहभाग होता. परंतु, पटनायक यांच्या नेतृत्त्वाखालील विशेष शाखेच्या काहीशा आक्रमक पवित्र्यामुळे त्यांनी याप्रकरणातून काढता पाय घेतला. आम्ही कर्नितला सुखरूप सोडविण्यासाठी रणनीती आखली होती. परंतु, विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी आमच्यावर कुरघोडी करण्याच्या नादात अचानक तीन जणांना ताब्यात घेतले. यामुळे अपहरणकर्त्यांना पोलिसांचा सुगावा लागून त्यांनी कर्नितला धोका पोहोचवण्याची शक्यता होती. परंतु, सुदैवाने तसे घडले नाही, असे त्यावेळी गुन्हे शाखेत असणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

या प्रकरणातून धडा घेतलेल्या हिमांशू रॉय यांनी सुफियान प्रकरणात तपासाचे श्रेय आपल्या टीमला मिळेल, याची पुरेपूर काळजी घेतली. त्यासाठी या प्रकरणात गुन्हे शाखेबरोबर काम करत असलेल्या दिंडोशी पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना कोणतीही माहिती बाहेर जाऊ न देण्याची सक्त ताकीद देण्यात आली होती. जेणेकरून विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी आयत्यावेळी येऊन या तपासाचे श्रेय घेऊ नये. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरातच्या सिल्वासा येथून सुफियानला ताब्यात घेईपर्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. अखेर अरूप पटनायक यांच्या पत्रकार परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी हिमांशू रॉय यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन सुफियानला सर्वांसमोर आणले. खरतरं ही पत्रकार परिषद सुरुवातील दिंडोशी पोलीस ठाण्यातच होणार होती. मात्र, गुन्हे शाखेने आयत्यावेळी ही वेळ बदलली. त्यामुळे पत्रकारांच्या विश्वात दोन अधिकाऱ्यांमधील सुप्त स्पर्धेची चर्चा चांगलीच रंगली होती. 
 

Web Title: Himanshu Roy and Arup Patnaik battle rift between Mumbai police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.