मुंबई: राज्य आणि मुंबई पोलिस दलात अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळणारे वरिष्ठ अधिकारी हिमांशू रॉय यांच्या आकस्मिक निधनाने एक कर्तबगार अधिकारी आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला.मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. रॉय यांनी पोलिस दलात विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावला आहे. एक धडाडीचे अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या निधनामुळे एका कार्यक्षम अधिकाऱ्याला आपण मुकलो आहोत. हिमांशू रॉय यांच्या कुटुंबीयांना आणि आप्तस्वकियांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना मी करतो. या सगळ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून हिमांशू रॉय 'सिक लिव्ह'वर होते. फिटनेसबाबत अत्यंत जागरूक आणि आग्रही असलेल्या या अधिकाऱ्याला दुर्धर अशा कॅन्सरनं ग्रासलं होतं. मोठ्या-मोठ्या केसेस हिमतीनं आणि हिकमतीनं सोडवणारे हिमांशू रॉय या आजाराशीही दोन हात करत होते. पण शरीर साथ देत नव्हतं. त्यामुळे मनानं ते खचून गेले होते. या नैराश्याच्या भरातच त्यांनी जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. कुलाबा येथील निवासस्थानी हिमांशू रॉय यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली. हे वृत्त वेगानं पसरलं आणि सगळ्यांनाच धक्का बसला. त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.