शिवनेरीवर रंगणार हिंदवी स्वराज्य महोत्सव; समृद्ध इतिहासाला उजाळा मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 10:43 AM2024-02-15T10:43:53+5:302024-02-15T10:46:09+5:30
या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृती, समृद्ध इतिहासाला उजाळा मिळणार आहे.
मुंबई : पुणे येथील जुन्नरमध्ये १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’चे आयोजन केले आहे. तीन दिवस होणाऱ्या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृती, समृद्ध इतिहासाला उजाळा मिळणार आहे.
इतिहासाची साक्ष देणाऱ्या जुन्नर शहरात तीन दिवस कला, संगीत, साहस आणि अध्यात्माच्या विविध रंगांमध्ये सजलेल्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या महोत्सवाला शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, पर्यटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महोत्सवात विविध उपक्रमांची पर्वणी :
या महोत्सवात वैविध्यपूर्ण आणि समृद्ध वारसा दाखवणाऱ्या पारंपरिक संगीत, नृत्य आणि नाट्य अशा सांस्कृतिक सादरीकरण असणार आहे. तसेच, हस्तकलेतून घडवलेल्या वस्तू, वस्त्रे आणि अद्वितीय स्मृतिचिन्हांच्या बहुरंगी प्रदर्शनांतून स्थानिक कारागिरांची कला अनुभवण्यास मिळेल. महोत्सवात स्थानिक चविष्ट, उत्तम दर्जाची खाद्यसंस्कृती अनुभवण्यास मिळेल.
हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ हा इतिहास, संस्कृती आणि साहस यांचा सुरेख संगम घडवणारा असेल. पर्यटन विभाग गेल्या वर्षभर आपल्या संस्कृतीवर आधारित वेगवेगळे महोत्सव साजरे करत आहे.
स्थानिक संस्कृती, समृद्ध वारसा याची माहिती नव्या पिढीला आणि पर्यटकांना होण्याच्या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
पर्यटन सचिव जयश्री भोज म्हणाल्या, राज्यासह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा महोत्सव मोलाची भूमिका बजावेल. राज्यातील गड-किल्ले प्रत्येक पर्यटनप्रेमींचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. या महोत्सवाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती या सोहळ्याचा अविस्मरणीय अनुभव घेतील.
गिर्यारोहण, मंदिर दौरे व अन्य कार्यक्रमांसाठी बारकाईने आखलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून हा महोत्सव बहुआयामी अनुभव देणारा ठरेल, असे पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले.