नवी मुंबई - देशाच्या पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल, भाषेबद्दल असलेले प्रेम लपवता येत नाही, मग तुम्ही का लपवताय, असा टोला मारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मराठीलाच टिकवण्यासाठी धडपड करावी लागत असल्याची खंत व्यक्त केली. महाराष्ट्र मंडळाकडून अमेरिकेत शंभरहून अधिक मराठी शाळा चालवल्या जात असल्या तरीही सर्वप्रथम राज्यात लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. राज्य शासनातर्फे वाशीत आयोजित विश्व मराठी संमेलनासाठी ते रविवारी उपस्थित होते. त्यावेळी ते बाेलत हाेते.
शासनातर्फे वाशी येथे तीनदिवसीय विश्व मराठी संमेलन भरवण्यात आले आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. राज्यात मराठी शाळा बंद होत असताना महाराष्ट्र मंडळ अमेरिकेत सुमारे १०० मराठी शाळा चालवत असल्याचे गौरवोद्गार राज ठाकरे यांनी काढले. मात्र, अगोदर महाराष्ट्रात लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल, स्वतःच्या भाषेबद्दलचे प्रेम लपवता येत नाही, तर तुम्ही-आम्ही ते का लपवतोय, असाही प्रश्न त्यांनी उपस्थितांना व्यक्त केला.
मराठी भाषेच्या प्रसाराबद्दल शासनाच्या असलेल्या उदासीनतेबद्दल खंत व्यक्त करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शासनाने मराठी भाषेवर उपकार करावेत, असा टोला मारला.