हिंदी मालिकांना संपाचे ग्रहण! मुंबईबाहेर शूटिंग; ८ हजार कोटींचा उद्योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 03:10 AM2017-09-03T03:10:42+5:302017-09-03T03:11:01+5:30
मायानगरीतील मनोरंजन उद्योगाला संपाचे ग्रहण लागले असून, ‘फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ने (एफडब्लूआयसीई) १७ महिन्यांत तब्बल ९ वेळा संप केला आहे.
- योगेश बिडवई।
मुंबई : मायानगरीतील मनोरंजन उद्योगाला संपाचे ग्रहण लागले असून, ‘फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ने (एफडब्लूआयसीई) १७ महिन्यांत तब्बल ९ वेळा संप केला आहे. ‘एफडब्लूआयसीई’ने अवास्तव मागण्या करत, मनोरंजन उद्योगाला त्यांच्या दावणीला बांधले आहे. तंत्रज्ञांना संपात सहभागी होण्यासाठी धमक्या दिल्या जातात, त्यामुळे टीव्ही मालिकांचे शूटिंग परराज्यात सुरू झाले आहे.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून ‘इंडियन फिल्म अँड प्रोड्युसर्स कौन्सिल’च्या (आयएफटीपीसी) पदाधिकाºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदनही दिले होते. त्यानंतर, कामगार मंत्र्यांकडे बैठक होऊन तोडगा निघाला. मात्र, सततच्या संपाला कंटाळून हिंदी टीव्ही वाहिन्यांच्या व्यवस्थापनाने निर्मात्यांना दुसºया राज्यात शूटिंग करण्याची आग्रही सूचना केली आहे. मालिका निर्मितीमधील शेवटचा घटक असलेल्या स्पॉट बॉयला महिन्याला २१ हजार वेतन व इतर सुविधा देण्यात येतात. लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामन आदींनाही चांगले वेतन दिले जाते. मात्र, त्यानंतरही ‘एफडब्लूआयसीई’कडून निर्मात्यांना सतत त्रास दिला जातो, असे ‘आयएफटीपीसी’चे सहअध्यक्ष जे. डी. मजिठिया यांनी सांगितले.
आशिष शेलार यांचा पुढाकार
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुढाकार घेऊन निर्माते, कलावंत व तंत्रज्ञांमध्ये समेट घडविला. आम्ही कामगार किंवा तंत्रज्ञांविरोधात नाही. संपकरी संघटना चर्चेसाठी पुढे आल्या. त्यामुळे लवकर तोडगा निघाला. सततचा संप मनोरंजन उद्योगाला परवडणारा नाही. मुंबई १०० वर्षांपासून मनोरंजन उद्योगाची पंढरी आहे. मुंबईचे वैभव कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल, असे शेलार यांनी सांगितले.
रोजगारावर गदा येणार
हिंदी मालिकांच्या निर्मितीमधून मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक रोजगार मिळतो. या उद्योगाची वार्षिक उलाढाल तब्बल ८ हजार कोटी आहे. त्यानंतर, प्रादेशिक भाषांमध्ये दक्षिणेत मोठी उलाढाल होते. मुंबईत हिंदीबरोबरच मराठी, काही प्रमाणात गुजराती व इतर भाषक मालिकांचीही निर्मिती होते. मुंबईबाहेर मालिकांची शूटिंग सुरू झाल्याने, येथील रोजगारावर गदा येणार आहे.
तंत्रज्ञ आणि वेतन (महिना)
दिग्दर्शक १३ लाख
सिनेमॅटोग्राफर १८ लाख
प्रॉडक्शन डिझायनर चमू ५३ लाख
कला दिग्दर्शक चमू ३३ लाख
मुख्य मेकअप आर्टिस्ट ७० हजार
इलेट्रिशियन २५ हजार
लाइटमन २२ हजार
स्पॉटबॉय २१ हजार
सर्व सहायक १७ हजार