मुंबई :
पावसाळ्यात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी पुढील आठवड्यापासून केली जाणार आहे, अशी माहिती मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच २.८७ कोटी लीटर पाणी साठवण्याच्या जल टाक्यांचे काम ऐतिहासिक ठरणार आहे. त्यामुळे यंदा हिंदमाता तुंबणार नसल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.
एफ/दक्षिण विभागातील हिंदमाता येथील पावसाचे पाणी साठविण्यासाठी महापालिकेकडून सेंट झेविअर्स मैदानात भूमिगत जलधारण टाक्या बांधण्यात आल्या आहेत. ठाकरे म्हणाले की, हिंदमाता परिसराच्या भौगोलिक रचनेमुळे जोरदार पावसाप्रसंगी येथील सखल भागात पाणी साचते. या समस्येवर मात करण्यासाठी सेंट झेविअर्स मैदानात भूमिगत जल धारण टाकी बांधण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे.
पाण्याचा निचरा होणार जलदगतीनेपंपिंग स्टेशन व भूमिगत जलधारण टाकीमुळे पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यास मदत होईल. पूर्वीच्या तुलनेत आता हिंदमाता परिसराला दिलासा मिळाला आणि त्याचा अनुभव सर्वांनी घेतला. मिलन सबवे आणि इतर सखल भागांचाही अभ्यास करून उपाययोजना करण्यात येईल.