मुंबई : पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रविवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चात अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
दक्षिण मुंबईत अप्पर आयुक्तांच्या नेतृत्वाखाली हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त मार्गावर असणार आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोनद्वारे मोर्चावर नियंत्रण ठेवले जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिले आहेत. मनसेच्या मोर्चाचा मार्ग गिरगाव चौपाटी - आझाद मैदान असा आहे.
राज ठाकरे यांच्याकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याने मोर्चा व आझाद मैदानावर होणा-या सभेच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस दक्ष आहेत. दक्षिण मुंबईतील पोलीस ठाण्यातील पोलिसांबरोबरच विभागीय अधिकारी, अंमलदार, दंगल नियंत्रण पथक, बीडीडीएस, वाहतूक पोलीस, राज्य राखीव दलाच्या जवानांना रविवार सकाळपासून तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय अतिरिक्त ६०० जवानांना पाचारण केले आहे.
मनसेच्या मोर्चाचा मार्ग?दुपारी 12 वाजता गिरगाव चौपाटी- हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरुवात होईल. स्वतः राज ठाकरे मोर्चात सामील असतील. सर्व कार्यकर्ते, मोर्चात सहभागी होणाऱ्या संघटना आणि सर्वसामान्य नागरिक मागे असतील. शामलदास गांधी मार्गावरुन हा मोर्चा पुढे जाईल. तिथून मेट्रो सिनेमा भागात मोर्चा पोहोचल्यानंतर राज ठाकरे आणि काही नेते महापालिका मार्गावरुन आझाद मैदानात आत जातील. मनसे कार्यकर्ते आणि मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्ती फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावरुन तीन गेटनी आझाद मैदानात आत जातील.हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजन मनसेत परतलेकन्नडचे (जि. औरंगाबाद) माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शनिवारी मनसेत पुन्हा प्रवेश केला. भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन यांचे भाऊ प्रकाश महाजन हेही मनसेत परतले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत कृष्णकुंजवर प्रवेशाचा कार्यक्रम झाला. जाधव, महाजन यांच्याशिवाय औरंगाबादमधील सेना नेते सुहास दशरथे, नांदडेचे प्रकाश कौदगे यांनीही मनसेत प्रवेश केला. जाधव हे दिवंगत नेते रायभान जाधव यांचे पुत्र असून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.