Join us

रविवारी मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चा; भाजपा करणार उद्धव ठाकरेंना टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 4:25 PM

संपूर्ण राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता मुंबईत २९ तारखेला हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे

मुंबई - धर्मांतरविरोधी कायदा आणि लव्हजिहाद कायद्यासाठी मुंबईत येत्या रविवारी २९ जानेवारीला हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता या मोर्चासाठी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर लोकांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे. हिंदू जागेगा, विश्व जागेगा, हिंदू बचेगा विश्व बचेगा हा नारा देत समस्त हिंदूंनी या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन आयोजक सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे. 

संपूर्ण राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता मुंबईत २९ तारखेला हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे प्रामुख्याने या मोर्चांना हजेरी लावत असून रविवारच्या मोर्चाबाबत नितेश राणेंनी ट्विटही केले आहे. नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, जो हिंदू की बात करेगा वही मुंबई पर राज करेगा असं कॅप्शन देत त्यांनी मोर्चाच्या आयोजनाचा फोटो पोस्ट केला आहे. 

उद्धव ठाकरेंवर साधणार निशाणाराज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर भाजपानं प्रामुख्याने हिंदू मुद्दा उचलून धरला. त्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदूत्वाचा मुद्दा सोडल्याचा आरोप करण्यात आला. मविआ काळात पालघरमध्ये झालेल्या साधुंवरील हल्ल्यावरूनही भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर मुंबईत याकूब मेमनची कबर सजवल्याप्रकरणी भाजपाने शिवसेना ठाकरेंना टार्गेट केले. राज्यभरात सुरू असणाऱ्या मोर्चातून प्रामुख्याने लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्याची मागणी करण्यात येत आहे. मुंबईत होणाऱ्या या मोर्चाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

महापालिका निवडणुकीवर लक्षआगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यात भाजपानं इतकी वर्षे सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला धोबीपछाड देण्याची तयारी केली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे ठाकरे गट कमकुवत झाला आहे. त्यात महापालिका निवडणुकीत अनेक माजी नगरसेवकही ठाकरेंना सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. त्यात हिंदू मोर्चातून भाजपा लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे. 

टॅग्स :नीतेश राणे भाजपाउद्धव ठाकरेहिंदू