शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 12:04 PM2023-02-18T12:04:15+5:302023-02-18T12:05:05+5:30
शिवजयंतीनिमित्त आजपासून मेजवानी
मुंबई : राज्य सरकारतर्फे शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात जवळपास एक लाख शिवप्रेमी या उत्साहात सहभागी होतील, असे नियोजन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आले आहे. किल्ल्याच्या पायथ्याजवळ जुन्नर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शिवकालीन गाव’ हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असून या वर्षी प्रथमच ‘महाशिव आरती’चे आयोजन करण्यात आल्याचेही लोढा यांनी सांगितले. सोहळ्याच्या निमित्ताने शिव वंदना, स्थानिक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिबिर, विविध स्पर्धांचे आयोजन, पर्यटक आणि मान्यवरांसाठी सहलीचे इत्यादींचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.