मुंबई : काँग्रेस, मुस्लिम लीग आणि ब्रिटिश यांना हिंदू साम्राज्य होऊन द्यावयाचे नव्हते. त्यामुळे त्यांनी नेहमी त्याला पूरक अशीच भूमिका घेतली होती. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याच्या वेळेस जर हिंदूंचे साम्राज्य झाले असते तर जगामध्ये आपला देश श्रेष्ठ देश ठरला असता. मात्र अद्यापही वेळ गेलेली नाही. त्यासाठी हिंदू एकत्र यायला हवेत, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि सावरकरांचे नातूू रणजित सावरकर यांनी ऑनलाइन व्याख्यानात केले.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानमालेत ते बोलत होते.
ते म्हणाले की १९२० मध्ये मुस्लिमांची संख्या २२ टक्के होती. १९४७ मध्ये ती ३५ टक्के झाली आणि विभाजन झाले. आजही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आणि विभाजन टाळण्यासाठी सावरकरांच्या विचारांची गरज आहे. त्यासाठी हिंदूंनी एकत्र होण्याची गरज आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या परिस्थितीची तुलना करीत त्यांनी हिंदूविरोधी विविध बाबींवर आसूड ओढले आणि यामागे हिंदूंना एकत्र येऊ द्यायचे नाही, असाच हेतू असल्याचे सांगितले. हिंदूंना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे हाती घेण्याची गरज आहे. शस्त्रे बाळगण्यासाठी हिंदूंनी अर्ज करावेत. त्यासाठी आम्हीही आंदोलन करणार आहोत. व्याख्यानात नेहरूंची धूर्त नीती, काँग्रेसचे धोरण आणि त्यांच्या नेत्यांनी केलेल्या कृत्यांवर त्यांनी कडाडून टीका केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दोन जन्मठेपांची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांना काळ्या पाण्यावर अंदमानात पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना १९२१ मध्ये भारतात पाठविल्यानंतर त्यांची रत्नागिरीच्या तुरुंगात रवानगी केली गेली. यामुळे हे वर्ष महत्त्वाचे असल्याचे सांगत ते म्हणाले की, इतिहास हा पुन्हा घडत असतो. या वर्षानिमित्त आपल्याला पूर्वीच्या सर्व बाबी आठवत नव्याने पावले टाकायची संधी मिळाली आहे. हिंदूंना या निमित्ताने एकत्र आणण्याची ही बाब आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विविध प्रसंगांत जी जी भूमिका मांडली, जे जे धोक्याचे इशारे दिले, जे मार्गदर्शन केले ते द्रष्टेपणाचे होते, त्याबद्दल रणजित सावरकर यांनी विविध घटनांचा संदर्भ घेत माहिती दिली.
विद्यार्थ्यांसमोर आपणाला ही माहिती देताना विशेष आनंद होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुस्लिमांना स्वतंत्र राज्य हवे असल्याची संकल्पना सय्यद अहमद यांनी मांडली ती १८८३ मध्ये. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मही झाला नव्हता. मुस्लिम लीगची स्थापना झाली. त्यानंतर सुधारणांद्वारे मुस्लिमांना सवलती दिल्या गेल्या. खिलाफत चळवळीबद्दल तीव्र टीका करीत रणजित सावरकर म्हणाले की, यामागे गांधी यांनी वैयक्तिक पाठिंबाही दिला आणि ते त्या चळवळीचे भारतातील अध्यक्षही होते. १९२१ मध्ये या खिलाफतीला काँग्रेसनेही पाठिंबा दिला आणि त्याचे परिणाम हिंदूंनी भोगले. मुसलमान आमच्याबरोबर असले पाहिजेत, या गांधींच्या हट्टासाठी मुस्लिमांचे लांगुलचालन तेव्हापासून केले गेले. सावरकर यांनी खिलाफतीबाबत तीव्र टीका केली.