Hindustani Bhau: 'हिंदुस्थानी भाऊ' हे भाजपाचं प्रॉडक्ट, कसून चौकशी करावी; काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 01:05 PM2022-02-02T13:05:29+5:302022-02-02T13:06:12+5:30
इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांना चिथावून मुंबईत हजारो विद्यार्थ्यांची गर्दी केल्याप्रकरणी 'हिंदुस्थानी भाऊ' उर्फ विकास पाठक याला पोलिसांनी अटक केली आहे.
इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांना चिथावून मुंबईत हजारो विद्यार्थ्यांची गर्दी केल्याप्रकरणी 'हिंदुस्थानी भाऊ' उर्फ विकास पाठक याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आता 'हिंदुस्थानी भाऊ' हे भाजपाचं प्रॉडक्ट असल्याचा आरोप केला आहे.
सचिन सावंत यांनी ट्विट करत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "हिंदूस्थानी भाऊ याला सोशल मीडियावर प्रस्थापित करुन त्याला फेमस करणारी व्यावसायिक कंपनी ही भाजपा, संघाच्या संबंधित लोकांची होती. अनेक वेळा हा व्यक्ती द्वेषपूर्ण व शिवीगाळ युक्त धर्मांध वक्तव्य करीत असताना फेसबुक व इतर सोशल मीडिया त्यावर कारवाई करत नव्हते. कारण त्याला संरक्षण होते", असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
हल्ली ज्या पध्दतीने मुलांना भडकवण्याचे काम करत आहे व पध्दतशीरपणे आंदोलनं केली जात आहेत त्यामागे मविआ सरकारला अडचणीत आणण्याचा भाजपाचा डाव दिसतो. या सर्व प्रकाराची खोल चौकशी मविआ सरकारने करावी.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 1, 2022
"हल्ली ज्या पद्धतीनं मुलांना भडकवण्याचे काम करत आहे व पद्धतशीरपणे आंदोलनं केली जात आहेत त्यामागे मविआ सरकारला अडचणीत आणण्याचा भाजपाचा डाव दिसतो. या सर्व प्रकारची खोल चौकशी मविआ सरकारने करावी", अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षेविरोधात विकास फाटक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊच्या सोशल मीडियावरील चिथावणीखोर वक्तव्याला प्रतिसाद देत सोमवारी मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उरतल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.
अनेक ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दी पांगवली. धक्कादायक म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच या आंदोलनाच्या स्थळासह वेळेबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली होती; मात्र याबाबत मुंबई पोलिसांसह राज्य गुप्तचर विभाग मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून आले होते.