Hindusthani bhau: हिंदुस्थानी भाऊला अटी व शर्तींसह जामीन मंजूर, लवकरच तुरुंगाबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 03:45 PM2022-02-17T15:45:02+5:302022-02-17T15:46:08+5:30
मुंबईतील सत्र न्यायालयाने अटी व शर्तींसह विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला 30 हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला आहे.
मुंबई - दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षेविरोधात विकास फाटक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊच्या सोशल मीडियावरील चिथावणीखोर वक्तव्याला प्रतिसाद देत मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उरतल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी, पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ नावाने प्रसिद्ध असलेल्या विकास पाठकविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली होती. आता, विकास पाठकला सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मुंबईतील सत्र न्यायालयाने अटी व शर्तींसह विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला 30 हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला आहे.
त्यामुळे, गेल्या 17 दिवसांपासून तुरुंगात असलेला हिंदुस्थानी भाऊ आता जेलमधून बाहेर येईल. 1 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा हिंदुस्थानी भाऊला पोलिसांनी अटक केली होती.
धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
धारावी पोलीस ठाण्यात विकास जयराम पाठक (हिंदुस्थानी भाऊ), (41 वर्षे रा. ठि.19/बी प्यारीनगर गोविंद पाटील खार दांडा,खार पश्चिम मुंबई.) विरोधात रजिस्टर क्रमांक ३७/२०२२ कलम ३५३,३३२,४२७,१०९, ११४,१४३,१४५,१४६,१४९,१८८,२६९,२७० भा.द.वि सह कलम ५१(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 सह कलम 37 (३),१३५ जमाव बंदी आदेश भंगसह कलम 3 महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुस्थानी भाऊसह इकरार खान वखार खान (वय 25 वर्षे) यासही पोलिसांनी अटक केली होती.
दरम्यान, मुंबईसह अनेक ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत आंदोलनाची गर्दी पांगवली. आंदोलनाच्या दोन दिवसांपूर्वीच स्थळासह वेळेबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली होती. मुंबईत जमा झालेल्या विद्यार्थ्यांच्या गर्दीबाबत मुंबई पोलिसांसह राज्य गुप्तचर विभाग मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.