आता हिंदुत्वाचा गजर, निवडणुकीनंतर विसर पडू नये, उद्धव यांचा मोदींना चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 07:24 AM2019-04-03T07:24:44+5:302019-04-03T07:26:14+5:30
हिंदुत्वाची गर्जनाच देशाला सुरक्षेची कवचकुंडले देईल. तेव्हा आज निवडणुकीत हिंदुत्वाचा गजर व निवडणुका संपल्यावर विसर असे निदान आता तरी घडू नये असा चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून नरेंद्र मोदींना काढलाय.
मुंबई - हिंदुत्वाची गर्जनाच देशाला सुरक्षेची कवचकुंडले देईल. तेव्हा आज निवडणुकीत हिंदुत्वाचा गजर व निवडणुका संपल्यावर विसर असे निदान आता तरी घडू नये असा चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून नरेंद्र मोदींना काढलाय. 2014 सालीही मोदी यांच्या मागे ‘हिंदू’ समाज उभा राहिला व 2019 सालीही हिंदू समाज मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीस विजयाच्या शिखरावर नेईल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त करत वर्धा येथे प्रचारसभांचा मुहूर्त करताना पंतप्रधान मोदी यांनी जे हिंदुत्वाचे कार्ड आक्रमकपणे फेकले ते महत्त्वाचेच ठरते सांगत मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागतही उद्धव ठाकरेंनी केलं.
सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरेंनी हिंदू दहशतवाद आणि ओमर अब्दुला यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. पंतप्रधान मोदी व भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचा पुकार केला व हिंदुत्व राजकारणातून टाळता येणार नाही हे दाखवून दिले असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
सामना अग्रलेखातील काही महत्त्वाचे मुद्दे
नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील पहिल्या सभेत काही मुद्यांवर जोर दिला आहे. त्यात हिंदुत्वाचा मुद्दा आघाडीवर आला आहे. मोदी यांनी सेवाग्राममधून हिंदुत्वाची ठिणगी टाकली. काँग्रेसने जगभरात हिंदूंना बदनाम केले. हिंदूंची नाचक्की केली, असे मोदी यांनी ठणकावून सांगितले.
पाच हजार वर्षांच्या आपल्या संस्कृतीवर हिंदू दहशतवाद हा कलंक काँग्रेसने लावला. हिंदूंना दहशतवादी म्हणून कलंकित करणाऱ्या काँग्रेसला आपण माफ करणार का? असा सवाल मोदी यांनी केला व 2019 च्या रणांगणात हिंदुत्वाचे कार्ड आक्रमकपणे फेकले.
मोदी यांच्या सेवाग्राममधील सभेस गर्दी कमी होती व सभेचे मैदान चाळीस टक्के रिकामे होते, अशी काव काव काहींनी केली; पण वर्ध्यातील उष्णतेचा चढलेला पारा पाहता त्या तप्त ज्वाळांतही मैदान साठ टक्के गच्च भरले हे महत्त्वाचे आहे. म्हणजे विरोधकांनी ‘गर्दी’चे कारण देत अपशकून करण्याचा प्रयत्न केला,
भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद हे शब्द प्रचलित झाले. हिंदू दहशतवाद्यांनी समझोता एक्सप्रेस व मालेगावात बॉम्बस्फोट घडविल्याचा आरोप फक्त झाला नाही, तर बनावट पुरावे उभे करून खटले दाखल झाले. स्वामी असिमानंद, साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांना अटक करून त्यांच्यावर भयंकर अत्याचार केले.
हिंदू दहशतवाद या प्रचारामुळे पाकिस्तानातील दहशतवाद्यांना बळ मिळाले. हिंदुस्थानात जे दहशतवादी हल्ले होत आहेत त्यामागे पाकिस्तान नसून तुमच्याच देशातील हिंदू कट्टरपंथी असल्याची भाषा पाकडे करू लागले, हा प्रकार भयंकर होता.
26/11च्या हल्ल्यात शहीद झालेले करकरे, कामटे, साळसकर आदी पोलीस अधिकारी हे अतिरेक्यांनी मारले नाहीत, तर ते हिंदू दहशतवादाचे बळी ठरल्याची बकवासही काँग्रेस पुढाऱ्यांनी केली होती. हे देशाचे दुर्दैवच होते. या सगळय़ा प्रकाराने हिंदुस्थानची जगात नाचक्की झाली.
पोलीस तुकाराम ओंबळे यांनी हौतात्म्य पत्करून या हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडले म्हणून ‘26/11’ आणि त्यातील पाकिस्तानचा हात जगासमोर उघड झाला. नाहीतर या हल्ल्यातील पाकिस्तान कनेक्शन पडद्याआडच राहिले असते आणि कदाचित त्यालाही ‘हिंदू दहशतवादा’चे लेबल चिकटवले गेले असते.
इंग्रजांच्या इतिहासातही हिंदू दहशतवादाची नोंद नाही, कश्मीरातील नेते सरळ सरळ देशविरोधी भूमिका घेत आहेत. या मंडळींनी सरळ सरळ हिंदुस्थानची घटना व कायदे मंडळालाच आव्हान दिले आहे. या विचारांची कीड वेळीच पायाखाली चिरडली नाही तर कश्मीर कायमचा अशांत व अस्थिर राहील.
हिंदुत्वाची गर्जनाच देशाला सुरक्षेची कवचकुंडले देईल. तेव्हा आज निवडणुकीत हिंदुत्वाचा गजर व निवडणुका संपल्यावर विसर असे निदान आता तरी घडू नये.