विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेनेचे मंत्री, आमदार आणि राज्यातील जिल्हाप्रमुख यांच्या येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी) या दोन कायद्यांचे स्वरूप कसे आहे याची माहिती दिली. आम्ही मरेपर्यंत हिंदुत्व सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.
इतरांप्रमाणे आम्ही कधीही रंग बदललेला नाही. कालही आमच्या हाती भगवा होता, आजही भगवाच आहे आणि भविष्यातही राहील असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख असलेले मुख्यमंत्री ठाकरे यांनी झेंड्याचा रंग बदलणाऱ्या मनसेला या बैठकीत टोला हाणला.राज ठाकरे यांनी मुंबईतील मनसेच्या मोर्चासमोर मांडलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेची शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे दखल घेतली. तसेच सीएए आणि एनआरसी कायद्यावरून शिवसेना आमदारांमध्ये स्पष्टता असावी यासाठी थेट मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बैठकीत पाचारण केले. या कायद्याबाबत माहिती देऊन बर्वे बैठकीतून निघून गेल्यानंतर ठाकरेयांनी आमदारांना मार्गदर्शन केले.
सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाबाबत कुठेही तडजोड केलेली नाही. आमचे हिंदुत्व कसे खणखणीत आहे, हे सगळ््यांनाच ठाऊक आहे. कुणी आम्हाला प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही, असे उद्धव यांनी भाजपचा उल्लेख न करता सुनावले. ते म्हणाले की, शिवसेना मरेपर्यंत हिंदुत्व सोडणार नाही. मला माझे हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी झेंडा बदलावा लागत नाही. मला माझे हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. कारण ते बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे. ते शुद्ध आहे. एक माणूस एक झेंडा हे आमचं ठरलेलं आहे.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून सुरू होत असताना आमदारांच्या आजच्या बैठकीत विविध शिवसेना आमदारांच्या मतदारसंघांमधील समस्या, त्यावरील उपाय आणि निधीची आवश्यकता याविषयी चर्चा होईल, असे म्हटले जात होते. मात्र आजची बैठक सीएए आणि एनआरसी या दोन कायद्यासंदर्भात होती.मतदारसंघांमधील समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियोजन केंद्र उभारले जाणार आहे. जिल्ह्यातील आमदारांना सोबत घेऊन नियोजन करणार आहोत, असा दिलासा ठाकरे यांनी आमदारांना दिला.मनसेच्या मोर्चाला भाजपचे पाठबळमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रविवारच्या मोर्चानंतर राजकीय पक्षांमध्ये आरोप -प्रत्यारोपांच्या फैºया झडू लागल्या आहेत. मोर्चामागे भाजपचा हात असल्याच्या आरोप शिवसेनेने केला. तर, ज्यांचा पक्ष आणि सरकार अजित पवार चालवितात त्यांनी आम्हाला शिकवू नये, असे प्रत्युत्तर मनसेने दिले.मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात आहे, असा आरोप शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केला. मनसेच्या मोर्चाचा शिवसेनेला फटका बसणार नाही. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचेच मुद्दे मनसे पुढे घेऊन जात आहे. १४ वर्षे मनसे कुठे होती, आताच पाकिस्तानी, बांग्लादेशी हे मुद्दे कसे आठवले, असा प्रश्न करतानाच मनसेची भूमिका सतत बदलणारी आहे, असे कायंदे म्हणाल्या. भाजपचे आशिष शेलार वारंवार कृष्णकुंजला भेटीगाठी करतात, असा आरोप त्यांनी केला.यावर, ज्यांचा पक्ष आणि सरकार अजित पवार चालवतात त्यांनी आम्हाला शिकवू नये. उद्धव ठाकरे यांच्या चुकीच्या राजकीय भूमिकेमुळे तळागळातील शिवसैनिक नाराज आहेत. येत्या काळात शिवसेनेला खिंडार पडेल, असे उत्तर मनसेच्या अविनाश जाधव यांनी दिले. तर, शिवसेना हीच राष्ट्रवादी काँग्रेसची ‘बी टीम’ झाली आहे. शिवसेनेच्या पायाखालची जमीन सरकल्याने ते टीका करत आहेत. मोर्चात सामान्य नागरिकही सहभागी झाले होते, असे मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले.काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीसुद्धा मोर्चावरून मनसेवर टीका केली. राजकारण व्यवसाय समजला की भूमिका, झेंडे आणि भाषा बदलतेच. मग मोर्चे काढा वा चिथावणीखोर भाषणे करा, जनतेच्या दृष्टीने त्यांची किंमत शून्य असते. भाजपच्या धार्मिक द्वेष एक्स्प्रेससाठी मनसेने इंजिन भाड्यावर दिले. पण, इथेही ते फेल होईल, असा टोला काँग्रेसच्या सावंतांनी लगावला.