महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हिप-हॉपची भुरळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 11:40 PM2019-03-03T23:40:21+5:302019-03-03T23:40:39+5:30
अपना टाइम आयेगा म्हणत रणवीर सिंगचा गल्ली बॉय चित्रपट आला आणि त्याच्या हिप-हॉप स्टाईलने अख्ख्या तरुणाईला भुरळ पाडली.
- सीमा महांगडे
मुंबई : अपना टाइम आयेगा म्हणत रणवीर सिंगचा गल्ली बॉय चित्रपट आला आणि त्याच्या हिप-हॉप स्टाईलने अख्ख्या तरुणाईला भुरळ पाडली. गल्लीगल्लीतून अंडरग्राउंड हिप-हॉप संस्कृती जोपासणारी तरुणाई यानिमित्ताने समोर येऊ लागली आहे. इतकेच काय तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या आणि भन्नाट विषयांवरचे स्पूफ यानिमित्ताने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये कुणी इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम कसा बोरिंग असतो यापासून ते पबजी खेळणे त्यांच्या आयुष्यात किती रुजलेय इथपर्यंत तसेच कामवाल्या बाईवरचे स्पूफही वेगाने व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे या स्पूफला हजारोंच्या संख्येने लाइक आणि सबस्क्राइब्स मिळत आहेत.
विशिष्ट शैलीत वेगानं तालात गायलेलं रॅप साँग हा तर हिप-हॉपचा आत्मा आहे. बीटबॉक्सिंग म्हणजे तोंडानं आवाज काढून निर्माण केलेलं संगीत. वेगवेगळ्या गाण्यांचं किंवा संगीताचं मिक्सिंग, ग्राफिटी, त्यालाच साजेशी फॅशन-पेहराव हाही हिप-हॉपचा भाग आहे. एरवी हिप-हॉप म्हणजे रॅपर्समधली लढाई, शिवीगाळ करणारी गाणी, बिनधास्त लाइफस्टाईल अशी काहीशी नकारात्मक प्रतिमा अनेकांच्या मनात तयार झालेली असते. मात्र त्यातून अनेकदा समाजातील वास्तववादी चित्रण नवे कलाकार आणि कॉलेज विद्यार्थी उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकदा ते विनोदी शैलीकडेही अधिक झुकताना दिसते. विशेषत: सध्या व्हायरल होणारे स्पूफ हे विनोदी शैलीतलेच आहेत. व्हिवा कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी असली इंजिनीअरिंग नावाने तयार केलेला स्पूफ सध्या खूप व्हायरल होत आहे. त्याला तब्बल १.५ हजार सबस्क्राईब मिळाले आहेत. टाइमपास म्हणून तयार केलेल्या या व्हिडीओला मिळालेला प्रतिसाद पाहून अनेक प्राध्यापक आणि मित्रांनी त्यांना हे पुढे चालू ठेवण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती यामधील विद्यार्थ्यांनी दिली. याचसोबत सध्या पबजी गेम कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये किती रुजलेय हे दाखवणारे स्पूफही यूट्युबवर चांगलेच धुमाकूळ घालत आहे.
>अभ्यासक्रम पंधरा आठवड्यांचा
हिप-हॉपकडील विद्यार्थ्यांचा एकूण ओढा पाहता मुंबई विद्यापीठातही लवकरच याची अधिकृत सुरुवात होणार असून यासाठीचा अभ्यासक्रमही विद्यापीठाकडून तयार करण्यात आला आहे. यामध्ये एकूण ९ प्रकार असून त्यातील ग्राफिटी, डीजेइंग, बी-बॉइंग आणि रॅप हे लोकप्रिय प्रकार आहेत. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने अभ्यासक्रमाची रचना केली असल्याची माहिती विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझम विभागाचे संजय रानडे यांनी दिली. १५ आठवड्यांच्या या कोर्ससाठी केवळ पाच हजार एवढे शुल्क भरून विद्यार्थी शनिवार-रविवार या दिवशी शिकवणी घेऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.