लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आरामदायी आसने, वेगाने प्रवास करण्यासाठी दमदार इंजिन आणि आकर्षक रंगसंगती... अशा नव्या धाटणीच्या हिरकणी खासगी बसगाड्यांना टक्कर देण्यासाठी मंगळवारपासून धावणार आहेत. परवडणाऱ्या दरात आणि निमआराम सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाच्या हिरकणीला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असून, आता या नव्या गाड्याही प्रवाशांच्या पसंतीस उतरतील. १० गाड्यांचा पहिला टप्पा आज, मंगळवारी एसटीच्या प्रवासी गाड्यांच्या ताफ्यात दाखल होणार असून, दोन दिवसांत आणखी दहा गाड्यांची भर पडणार आहे. रायगड विभागातून या नव्या हिरकणी धावणार आहेत.
बैठे आसनी असलेल्या खासगी गाड्यांना टक्कर देण्यासाठी आरामदायी आसने आणि वेगाने प्रवास पूर्ण करण्यासाठी दमदार इंजिनाचा समावेश हिरकणीत आहे. एसटीची ब्रँडसेवा असलेली हिरकणीची बांधणी पाच वर्षांपासून रखडली होती. या सेवेला संजीवनी देण्यासाठी दापोडीस्थित एसटी मध्यवर्ती कार्यशाळेत हिरकणीची बांधणी सुरू आहे. एकूण २०० हिरकणी बांधण्यात येणार आहेत. यापैकी १० गाड्या मंगळवारी आणि १० गाड्या गुरुवारी महामंडळात दाखल होणार आहे. रायगड विभागातील रोहा आणि मुरुड आगारांच्या माध्यमातून या गाड्या धावणार आहेत. निमआराम श्रेणीप्रमाणेच तिकीट भाडे आकारण्यात येणार असून, यात कोणताही बदल नाही. बस आकर्षक दिसावी, म्हणून आतील बाजूस थर्मोप्लास्टीक शीट लावण्यात आली आहे.
या सुविधा मिळतीलप्रवाशांसाठी मॅगझिन पाऊच, पाण्याची बाटली ठेवण्यासाठी होल्डर, तसेच बॅग हुक इत्यादी सुविधा आहेत. एअर सस्पेंशनसह आरामदायक आसने आहेत. सौंदर्य वाढविण्यासाठी पुढील बाजूस तयार डॅशबोर्ड बसविण्यात आले आहेत. बसची देखभाल दुरुस्ती सुलभ व्हावी, यासाठी हॅन्डल सुविधा देण्यात आलेली आहे. बॅटरी बॉक्स, प्रवाशी सामान कक्ष, राखीव टायर इत्यादींच्या सुलभ हाताळणीसाठी बसच्या बाजूला व्यवस्था आहे.
अशी आहेत वैशिष्ट्ये आकर्षक अंतर्गत आणि बाह्य रंगसंगती पुशबॅक सीट्स रीडिंग लॅम्प आसनांजवळ मोबाइल चार्जिंगची सुविधा एअर सस्पेंशन बस