Join us

हिरामणी तिवारी मुंडन प्रकरणात शिवसेना शाखाप्रमुखासह चौघांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 4:16 AM

२२ डिसेंबरला तिवारी यांनी आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवरून व्हायरल केला

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित करणाऱ्या हिरामणी तिवारीला मारहाण करून त्याचे मुंडण करणाºया शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुगदर, प्रकाश हसबे, श्रीकांत यादव, सत्यवान कोळंबेकर या चौघांना अटक करण्यात आली आहे. वडाळा टी टी पोलिसांनी ही कारवाई केली.

२२ डिसेंबरला तिवारी यांनी आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवरून व्हायरल केला. याच रागात जुगदर आणि अन्य शिवसैनिकांनी त्याला धमकावून मारहाण केली आणि त्यांचे केस कापले. हा प्रकार सुरू असतानाच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तिवारी यांच्यासह शिवसेना शाखाप्रमुखांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात आणले. तेथे पोलिसांनी दोघांची समजूत काढली. दोघांनीही तक्रार दिली नाही. पुढे, हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समजताच तिवारी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी तेव्हा शिवसैनिकांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता. मात्र या प्रकरणात दखल पात्र गुन्हा नोंदवावा, आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार तामिळ सेलवन यांनी बुधवारी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले.त्यानंतर पोलिसांनी जुगदर, हसबे यांच्यासह अन्य शिवसैनिकांविरोधात दंगल, मारहाण, जीवे ठार मारण्याची धमकी आणि अपमानास्पद वर्तणूक करणे आदी कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. गुरुवारी जुगदरसह त्याच्या अन्य तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली.

टॅग्स :शिवसेनामुंबई