हिरानंदानी रुग्णालयाचे बूस्टर डोससाठी पालिकेसह राज्य शासनाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:06 AM2021-09-24T04:06:52+5:302021-09-24T04:06:52+5:30
मुंबई : लसीकरण पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच दोन डोस पूर्ण घेतल्यानंतर आता जागतिक स्तरासह सर्वत्र बूस्टर डोसची चर्चा सुरू झाली ...
मुंबई : लसीकरण पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच दोन डोस पूर्ण घेतल्यानंतर आता जागतिक स्तरासह सर्वत्र बूस्टर डोसची चर्चा सुरू झाली आहे. त्या धर्तीवर आता पवईतील हिरानंदानी रुग्णालयाने पालिकेसह राज्य शासनाकडे आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यासाठी परवानगीदाखल साकडे घातले आहे.
लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्याने आता त्यांच्या शरीरातील प्रतिपिंडे कमी झाल्याचे आढळले आहे. तिसऱ्या लाटेचा धोका संभावत असताना या आरोग्य कर्मचाऱ्यांना तिसरा बूस्टर डोस देण्याचा प्रस्ताव हिरानंदानी रुग्णालयाने आखला आहे. मात्र याकरिता अजूनही केंद्र शासनाने मान्यता दिलेली नाही, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर काही देशांनी याला हिरवा कंदील दाखविला आहे.
हिरानंदानी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजित चॅटर्जी यांनी सांगितले, आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा लसीचा डोस घेऊन सहा महिने उलटले आहेत. आरोग्य कर्मचारी हा कोरोना सेवेतील महत्त्वाचा दुवा आहे, त्यांचे प्रमाण अन्य लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. नुकतेच असोसिएशन ऑफ हाॅस्पिटल यांच्या बैठकीतही याविषयी चर्चा करण्यात आली. अजूनही केंद्र शासनाशी याविषयी चर्चा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याची माहिती डॉ. रविशंकर यांनी दिली आहे.
बूस्टर डोस म्हणजे काय?
एखाद्या विशिष्ट बॅक्टेरिया अथवा व्हायरसविरोधात लढण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बूस्टर डोसची गरज असते. हा बूस्टर डोस त्याच लशीचा असू शकतो जी लस आधीच एखाद्या व्यक्तीने घेतली आहे. बूस्टर डोस शरीरात अधिक ॲंटीबॉडीज निर्माण करत प्रतिकारशक्तीमध्ये वाढ करतो.
बूस्टर डोस कुणाला घेता येतो?
ज्यांनी लसीचे पूर्ण डोस घेतले आहेत, त्यांनाच हा बूस्टर घेता येतो. कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट्स सातत्याने समोर येत असल्याने जगभरातील आरोग्य संस्था बूस्टर डोस देण्याआधी अनेक गोष्टींबाबत विचार करतील. सर्वांत आधी हा बूस्टर डोस ज्येष्ठ व्यक्तींना देण्याबाबतच विचार केला जाऊ शकतो. अथवा असे लोक ज्यांच्या शरीरात अधिक प्रमाणात अँटीबॉडीज तयार झालेल्या नाहीयेत.