लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य शासनाच्या सेवेत कायमस्वरूपी न करता वर्षानुवर्षे अस्थायी म्हणून काम करावे लागत असल्यामुळे यवतमाळ य़ेथील चतुर्थश्रेणी कर्मचारी देविदास वडस्कर यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. शासन अजून किती जणांचे बळी घेणार आहे, असा प्रश्न राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी निवेदनाद्वारे केला आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी ९२५ पैकी ६४२ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचे आश्वासन दिले असून त्याची कार्यवाही झालेली नाही.
सर्व बदली कर्मचारी हे रुग्णालयातील मंजूर रिक्त पदांवर कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अविरत रुग्णसेवा पुरवली आहे. संपूर्ण राज्यातील रखडलेल्या ९२५ बदली कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून एकाच वेळी शासनसेवेत कायम केल्यास त्या सर्वांचा प्रश्न कायमचा निकाली लागेल. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करावा, अशी मागणी महासंघाने केली आहे.