ठाणे - पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि त्यांच्या गँगकडून मनसूख हिरेन यांच्या कुटुंबियांना धोका आहे. परिणामी त्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. हिरेन यांच्या कुटुंबीयांची किरीट सोमय्या यांनी मंगळवारी ठाण्यातील त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही मागणी केली.
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं असलेली गाडी ठाण्यातील मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. याप्रकरणी चौकशी सुरु असतानाच मनसुख यांचा मृतदेह शुक्रवारी मुंब्रा रेतीबंदर खाडीत सापडला होता. त्यानंतर हिरेन यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याबाबत तर्कवितर्क लावण्यात येतं होते.
दरम्यान हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना किरीट सोमय्या म्हणाले की, मनसूख हिरेन यांचे कुटुंबिय अत्यंत दुःखी आणि भयभीत आहेत. या सर्व प्रकरणात त्यांचा प्रामाणिक माणूस गेला याचे त्यांना दुःख आहे. सुरुवातीला या प्रकरणाला ज्याप्रमाणे पोलिसांनी हत्येला आत्महत्या दाखविण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यांना प्रचंड यातना झाल्या आहेत. पोलिसांच्या या भूमिकेबाबत मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे त्यांना जाब विचारतील का? असा प्रश्न यावेळी सोमय्या यांनी उपस्थित केला. हें माफियाचं सरकार आहे. ते सचिन वाझे यांना अटक करणार नाही. सचिन वाझे आणि गँग काही करू शकते. परिणामी मनसुख यांच्या कुटुंबियांना संरक्षण देणे गरजेचे आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हें मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार वागत आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला.