ठाणे शहरात दिल्या भेटी : वाझे-मनसुख यांच्या संबंधाबद्दल घेतली माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई / ठाणे: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटालिया या इमारतीजवळ स्फोटके असलेली मोटार सापडल्याच्या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने सुरु केला आहे. एनआयएचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांनी आपल्या पथकासह मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची गुरुवारी तब्बल तीन तास चौकशी केली. त्यानंतर या पथकाने ठाण्यातील इतरही काही ठिकाणी जाऊन विचारपूस केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हिरेन यांच्या खूनप्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या अधिपत्याखालील विविध पथकांकडून तो सुरु आहे. बुधवारी या पथकाने मुंब्रा पोलिसांकडून यासंबंधित गुन्ह्याच्या स्टेशन डायरीतील नोंदीही घेतल्या. सध्या हिरेन आणि त्यांच्याशी संबंधितांच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्स तसेच स्फोटकांच्या कारमागे असलेल्या अन्य एका इनोव्हा मोटारीचाही शोध या पथकाकडून घेतला जात आहे. याआधी स्फोटकांच्या मोटारीच्या संबंधित तपासही एटीएसकडेच होता. आता हा तपास एटीएसकडून एनआयएने आपल्याकडे घेतला आहे. एनआयएचे १९९५ च्या अॅगमुट केडर (केंद्रशासित प्रदेश) मधील भारतीय पोलीस सेवेतील विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या नियंत्रणाखालील पथकाकडून हा तपास सुरू आहे. (शुक्ला यांची अलीकडेच केंद्रामध्ये प्रतिनियुक्तीवर पदोन्नती झाली आहे.) शुक्ला यांच्यासह चार वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी ठाण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील ‘विजय पाम’ या इमारतीमधील हिरेन यांच्या निवासस्थानी गुरुवारी (११ मार्च) भेट दिली. त्यावेळी इमारतीमधील काहींनी गर्दी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या अधिकाऱ्यांच्या चमूने आपली ओळख दाखविल्यानंतर मात्र तिथे फारसे कोणी उभे राहिले नाही. दरम्यान, दुपारी २.२५ ते सायंकाळी ५.२५ या तीन तासांच्या काळात या अधिकाऱ्यांनी मनसुख यांच्याकडे संबंधित मोटार (स्कॉर्पिओ) कधी दुरुस्तीसाठी आली होती, ती त्यांनी कोणत्या कारणासाठी दुरुस्तीनंतरही त्यांच्याकडे ठेवली होती, मुंबईत १७ फेब्रुवारीला ते कोणत्या कामाकरिता गेले, त्यानंतर त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात केलेली तक्रार, तसेच १८ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी गाडी अँटालिया येथे मिळेपर्यंत काय काय घडले, हिरेन या दरम्यान कोणा-कोणाच्या संपर्कात होते? व का संपर्कात होते, सचिन वाझे यांच्याशी हिरेन यांचा कसा संपर्क आला याबाबत माहिती घेतली. हिरेन कुटुंबीयांनी कोणत्या कारणांमुळे वाझे यांच्यावर आरोप केले, याचीही माहिती घेतली. यावेळी मनसुख यांची पत्नी विमला, मोठा मुलगा मित आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते, अशीही माहिती सूत्रांनी दिली.
* वाझे यांचीही हाेणार चाैकशी!एका पथकाने गुरुवारी अंबानी यांच्या खासगी सुरक्षा अधिकारी व त्यावेळी बंगल्यावर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांकडून त्याबाबत माहिती घेतली. लवकरच त्यांचे सविस्तर जबाब नोंदविण्यात येईल. याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वादग्रस्त सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
............