Join us

वडिलांना मानसिक आजार, रिक्षा चालवून भावाने दिला आधार, वसिमा बनली उपजिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:16 AM

नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील सांगवी गावच्या अत्यंत गरीब कुटुंबातील शेख वसिमा मेहबुब हिची राज्यसेवा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली आहे.

मयूर गलांडे

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत राज्याच्या ग्रामीण भागातील तरुण-तरुणींनी मोठे यश मिळवल्याचे पाहायला मिळाले. त्यामध्ये, अनेकांनी परिस्थितीशी दोनहात करत, आपलं ध्येय गाठलं आहे. कुणी, कक्ष अधिकारी, कुणी नायब तहसिलदार, कुणी तहसिलदार तर कुणी उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. नांदेड जिल्ह्यातील छोट्याशा गावातील वसिमा शेख यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत उपजिल्हाधिकारीपदाचं मेरीट मिळवत गगनभरारी घेतली. 

नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील सांगवी गावच्या अत्यंत गरीब कुटुंबातील शेख वसिमा मेहबुब हिची राज्यसेवा परीक्षेतून उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. वडिलांना मानसिक आजार, तर आई मोल-मजुरी करुनच कुटुंबाचा गाडा हाकायची. आईच्या या कष्टाला भावाची रिक्षा चालवून साथ मिळायची. त्यामुळे, आपल्या शिक्षणासाठी मोठा खर्च शक्य नसल्याचे लक्षात घेऊनच वसिमाने सेल्फ स्टडीतूनच स्वत:ला सिद्ध केले. वसिमाचे इयत्ता सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच पूर्ण झाले. त्यानंतर, कंधार येथून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती बेताची असल्याने चांगले मार्क मिळूनही आणि शिक्षण क्षेत्राची आवड असल्याने वसिमाने डीएड पदवी घेतली. याचदरम्यान, डीएड सीईटी परीक्षांची तयारी सुरु केली. मात्र, दरम्यानच्या काळात सीईटी परीक्षाच घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे, मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी घेऊन वसिमा यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली. याच कालावधीत त्यांचे लग्नही झाले. मात्र, लग्नानंतरही त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरुच ठेवली. 

वसिमा यांनी हालाकीच्या परिस्थितून शिक्षण पूर्ण करत, मुस्लीम समाजाला एक आदर्श घालून दिला आहे. मुस्लीम समाजातूनही प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत मुलींना शिक्षण दिले जाते आणि त्या आपलं ध्येय गाठू शकतात हेच वसिमाने दाखवून दिलंय. वसिमा यांच्या वडिलांना मानसिक आजार असल्याने ते उदरनिर्वाहासाठी काम करु शकत नाहीत. तर, वासिमा यांच्या आईने मोलमजुरी करुन, तर भावाने रिक्षा चालवून त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना मोलाची मदत केली. कुटुंबीयांच्या कष्टाची जाणीव ठेऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून वसिमा यांनी यापूर्वीच एसटीआय पदी नोकरी मिळवली आहे. सध्या, त्या नागपूर येथे विक्री कर निरीक्षकपदी कार्यरत आहेत. मात्र, आपलं उपजिल्हाधिकारीपदाचं स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यामुळेच, नोकरी सांभाळत त्यांनी आपल्या परीक्षेची स्पर्धा सुरुच ठेवली. अखेर,  जून 2020 मध्ये जाहीर झालेल्या निकालात उपजिल्हाधिकारीपदी त्यांची निवड झाली आहे.  

वसिमा यांच्या या निवडीनंतर तालुक्यासह मित्र परिवाराकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वसिमा यांच्यासह तिच्या आई-वडिल व भावाचेही कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मुलींनी न्यूनगंड बाळगता स्पर्धेत उतरावे, नथिंग इज इम्पॉसिबल असे वसिमा यांनी आपल्या निवडीनंतर बोलताना म्हटले. तर, परिस्थितीची कायम जाण ठेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि नागरिकांसाठी मी शक्य ते सर्वोतोपरी करणार असल्याचेही वसिमा यांनी म्हटले. 

टॅग्स :नांदेडएमपीएससी परीक्षापरीक्षानागपूर