लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सासूच्या ई-मेल आयडीवरून प्रेमजी परमारे नामक जावयाने मुंबई पोलिसांना बॉम्बस्फोट करत शहर उडवून देण्याची धमकी पाठविण्याचा प्रकार अंबोलीत उघडकीस आला आहे. पत्नीला माहेरी पाठविण्यास नकार देणाऱ्या सासूला धडा शिकविण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे पोलिसांना सांगताच त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
अंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमारे याने दोन वर्षांपूर्वी अनुराधा नामक तरुणीशी लग्न केले. पण, बेरोजगार असल्याने तिने त्याला सोडले आणि ती तिच्या आईकडे परत गेली. जेव्हाही परमारे तिला घरी परत आणण्यासाठी जायचा, तेव्हा त्याची सासू लक्ष्मी आपल्या मुलीला पाठवण्यास नकार देत होत्या. याचा बदला घेण्यासाठी परमारे याने लक्ष्मी यांच्या ई-मेल आयडीचा गैरवापर करून १ सप्टेंबर रोजी मुंबई पोलिसांना बॉम्बची धमकी पाठवली. त्याला पासवर्ड माहीत असल्याने त्याने सासूच्या ई-मेल आयडीमार्फत मेल पाठवत सोबत त्यांचा पत्ता आणि संपर्क तपशील जोडत मेल केला. अंबोली पोलिसांनी तपशीलाच्या मदतीने लक्ष्मींच्या निवासस्थानाचा शोध घेतला आणि त्यांची चौकशी केली. तेव्हा खरा प्रकार उघडकीस आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करेपर्यंत परमारे गुजरातला पसार झाला. दरम्यान, पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याच्याविरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ५०६ (२) आणि ५०५ (१) (ब) अंतर्गत दखलपात्र नोंदवत त्याची रवानगी कारागृहात केली आहे.