विद्यार्थ्याच्या हुशारीवर त्याच्या वेतनाचे मूल्यांकन केले जाऊ शकत नाही - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 01:39 AM2019-08-18T01:39:09+5:302019-08-18T01:39:26+5:30

नुकसानभरपाईची ही रक्कम अवाजवी असल्याने ‘रिलायन्स’ने उच्च न्यायालयात धाव घेतली.

His salary cannot be assessed on the wishes of the student - the High Court | विद्यार्थ्याच्या हुशारीवर त्याच्या वेतनाचे मूल्यांकन केले जाऊ शकत नाही - उच्च न्यायालय

विद्यार्थ्याच्या हुशारीवर त्याच्या वेतनाचे मूल्यांकन केले जाऊ शकत नाही - उच्च न्यायालय

Next

मुंबई : मोटार अपघातातील विद्यार्थी हुशार असला तरी त्याच्या हुशारीवरून त्याच्या वेतनाचे मूल्यांकन केले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोटार अपघात लवादाने एका विद्यार्थ्याच्या पालकांना नुकसानभरपाई म्हणून २१ लाख ९० हजार रुपये ठरविलेल्या रकमेत कपात केली. उच्च न्यायालयाने संबंधित इन्शुरन्स कंपनीला विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ लाख ८२ हजार रुपये देण्याचा आदेश दिला.

मोटार अपघात लवादाने कृष्णा कब्रा (२२) या विद्यार्थ्याच्या पालकांना २१ लाख ९० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश रिलायन्स जनरल इन्शुरन्स लि.ला दिले. नुकसानभरपाईची ही रक्कम अवाजवी असल्याने ‘रिलायन्स’ने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. विभा कंकवाडी यांच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होती.

कृष्णा एम.कॉमचा अभ्यास करत होता. ३१ डिसेंबर २०१५ रोजी तो अहमदनगर, खेडगाव येथील नगर-पुणे रोडवरून दुचाकी चालवत होता. त्याच्या पाठच्या सीटवर त्याचा मित्र बसला होता. समोरून आलेल्या बोलेरोने त्याच्या गाडीला उडविले. त्यात कृष्णाला खूप जखमा झाल्या. त्याला दोन-तीन रुग्णालयांत हलविण्यात आले. अखेर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी बोलेरोच्या ड्रायव्हरला ताब्यात घेतले. संबंधित वाहनाचा इन्शुरन्स काढण्यात आला होता.

नुकसानभरपाई म्हणून ५५ लाख रुपये मिळावे, यासाठी पालकांनी मोटार अपघात लवादात दावा केला. लवादाला सांगण्यात आले की, कृष्णा एका खासगी कंपनीत काम करत होता. तिथे त्याला १८ हजार वेतन होते. तो काही बाहेरची कामे करत होता. त्यातून दरमहा किमान ३,००० मिळत होते. अशा प्रकारे तो दरमहा २१,००० रुपये कमवत होता. लवादाने त्यांचा दावा अंशत: मंजूर करत इन्शुरन्स कंपनीला पालकांना २१,९०,००० हजार रुपये भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला.

- कृष्णाच्या पालकांनी त्याच्या वेतनासंबंधी कोणतेच पुरावे सादर केले नाहीत. केवळ लवादाला सर्व माहिती मौखिक स्वरूपात दिली आणि त्यावर विश्वास ठेवत न्यायालयाने पालकांना २१ लाख ९० हजार रुपये नुकसानभरपाईचे आदेश दिले. मुलगा एम.कॉम.चा अभ्यास करत होता, हे मान्य आहे. मात्र, एम.कॉमच्या आधारावर तो दरमहा २१ हजार कमवू शकतो, असा अंदाज लवादाने लावला व २१ लाख ९० हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला, असा युक्तिवाद इन्शुरन्स कंपनीच्या वकिलांनी सांगितले.

- पालकांनी दिलेली मौखिक माहिती बाजूला ठेवली तर केवळ अंदाज लावणेच शक्य आहे. पालकांनी सादर केलेल्या मुलाच्या बी.कॉम.च्या प्रमाणपत्रानुसार, संबंधित मुलाला बी.कॉम.मध्ये फर्स्ट क्लास मिळाला आहे. मुलगा एम.कॉमचा अभ्यास करत होता, यात शंका नाही. त्याचे भविष्यातील नियोजन, एम.कॉम. करून तो काय साध्य करणार होता, याविषयी पालकांनी काहीच माहिती दिली नाही. या माहितीच्या आधारे अंदाज लावणे शक्य होते, असे न्यायालयाने म्हटले.

१५ लाख ८२ हजारांची मिळणार नुकसानभरपाई
अपघात २०१५ मध्ये झाला. उच्चशिक्षितही कमी वेतनावर काम करत आहेत. त्यामुळे अपघात झालेला विद्यार्थी हुशार होता, असे म्हणून त्याचे दरमहा वेतन २०,००० रुपये असेल, असा अंदाज लावणे चुकीचे आहे. मात्र, तो एम.कॉम.च्या आधारावर दरमहा १०,००० रुपये कमवू शकला असता, असे म्हणणे योग्य ठरेल. त्यामुळे लवादाने मुलाला दरमहा २०,००० रुपये वेतन मिळेल, असा अंदाज लावून भरपाईची ठरविलेली रक्कम अयोग्य आहे. त्यात सुधारणा आवश्यक आहे, असे म्हणत न्यायालयाने इन्शुरन्स कंपनीला मुलाच्या पालकांना १५ लाख ८२ हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला.

Web Title: His salary cannot be assessed on the wishes of the student - the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.